थरारक व्हिडीओ | एलईडीने मच्छीमारी करणाऱ्यांचा पाठलाग

एका थरारक पाठलागाची. एलईडी लाइटचा वापर करून मच्छिमारी करण्यास केंद्र सरकारनं बंदी घातली आहे.

Updated: Apr 28, 2018, 02:43 PM IST

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : ही बातमी आहे, एका थरारक पाठलागाची. एलईडी लाइटचा वापर करून मच्छिमारी करण्यास केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. मात्र तरीही कोकण किनारपट्टीवर अनेकजण एलईडी लाइटचा वापर करतात. अशाच एका बेकायदा मच्छिमारी करणाऱ्या बोटीचा पारंपारिक मच्छिमारी करणा-यांनी थरारक पाठलाग केला. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ खोल समुद्रात हा पाठलाग रंगला. मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला आहे. ज्या बोटीचा पाठलाग सुरू आहे, त्या बोटीवर काही टनांचा जनरेटर सुद्धा आहे. 

या जनरेटरच्या मदतीनं एलईडी लाईट वापरून मासेमारी केली जाते. पाठलाग होत असलेल्या बोटीवर एलईडी लाईट सुद्धा दिसतायत. पारंपारिक मच्छिमारांची पाठलाग करून समुद्रात ही बोट पकडली आणि बोटीवरील एलईडी लाईटची मोडतोड केली. राज्याच्या मत्स्यसंवर्धन विभागाकडून एलईडी लाइट वापरणा-यांवर काहीच कारवाई होत नसल्यानं पारंपरिक मच्छिमारी करणा-यांनीच हे धाडसी पाऊल उचललं आहे. यानिमित्तानं पारंपरिक मच्छिमार विरूद्ध एलईडी लाइट वापरणारे मच्छिमार असा संघर्ष पेटला आहे.