IAS officer Pooja Khedkar: खासगी ऑडीवर लाल दिवा, महाराष्ट्र शासनची पाटी यामुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडकर वादात सापडल्या. यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप चॅटही व्हायरल झाले. त्यांनी खोटे नॉन क्रिमिएल प्रमाणपत्र जोडल्याची माहिती समोर आली. यामुळे दिवसेंदिवस त्यांचा पाय आणखीनच खोलात चालला आहे. यात आता पूजा खेडकर यांच्या आईची पोलीस, शेतकऱ्यांवर दादागिरी करतानाचे वृत्तही माध्यमांतून आले. दरम्यान पूजा खेडकरांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्यात आली.
वाशिम जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडेकर यांच्या बाबतीत नवीन माहिती समोर आली आहे.त्यांच्याबाबतीत केंद्र सरकारकडून एक सदस्य समिती गठीत केली आहे. असे असताना दुसरीकडे मात्र वाशिम जिल्ह्यात त्यांचा प्रशिक्षण कार्यकाळ कसा असेल? याचं शेड्यूल ठरवण्यात आलंय.
11 जुलै 2024 पासून ते 6 एप्रिल 2025 पर्यंतचा हा त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. या दरम्यान त्यांना सुरवातीला जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागासोबत काम करावे लागेल त्यामध्ये महसूल विभाग, जिल्हा परिषद नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि इतर विभागात काम केल्यानंतर त्यांना अकोला महानगरपालिका आणि मंत्रालयातही पाच दिवस काम शिकावं लागेल.
तर यादरम्यान त्यांना एक आठवडा दिवाळीची रजा आणि शेवटी प्रशिक्षण संपल्यावर चार दिवस पुन्हा रजा मिळणार आहे.पुण्यात प्रशिक्षणा दरम्यान स्वतंत्र केबिन आणि इतर सरकारी लवाजमा मागणाऱ्या पूजा खेडकर आता वाशिममध्ये या दिलेल्या शेड्युलनुसार आपलं प्रशिक्षण पूर्ण करतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पुण्यातून सुरु झालेलं पूजा खेडकर प्रकरण आता देशभरात चर्चेचा विषय बनलंय. राज्यासोबतच राष्ट्रीय वाहिन्यांनी हे प्रकरण उचलून धरल्याचे दिसत आहे. यानंतर आता पंतप्रधान कार्यालयानेही पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने केवळ बदली केली असली तरी पूजा यांच्यावर थेट दिल्लीतून कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ पंतप्रधान कार्यालयच नाही तर एलबीएसएनएएनेही पूजा यांच्या प्रशिक्षण काळातील अहवाल मागवला आहे. यामुळे पूजा खेडकरांच्या अडचणी येणाऱ्या काळात वाढणार असल्याचं दिसतंय.
आयएएस पदापर्यंत पोहोचण्यासाठी पूजा खेडकर यांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून पूजा यांची निवड झाली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.या पार्श्वभूमवर पंतप्रधान कार्यालयातून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आली आहे. तसेच देशातील सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकदमीने (एलबीएसएनएए) सुद्धा यासंदर्भातील अहवालही महाराष्ट्र सरकारकडून मागवला आहे.