सचिन कसबे, झी मीडिया, सोलापूर : ATMमधून रक्कम काढताना कोणाची मदत घेत असाल तर सावधान! तुमची फसवणूक होऊ शकते. पंढरपूरमध्ये अशीच घटना घडली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
अकलूज येथील इदगाह मस्जिद येथे मौलवीचे काम करणारे मोहम्मद अफजल हुसेन कामानिमित्त पंढरपुरात आले होते. पंढरपुरातील बँक ऑफ इंडिया बँकेच्या (Bank of India) ATMमधून पैसे काढण्यासाठी गेले होते. अशिक्षित असल्यामुळे पैसे काढताना अडचण निर्माण झाली. ATMमध्ये कार्ड टाकून एकूण 10 हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे काही निघाले नाही.
त्यावेळी त्यांच्या पाठीमागे 2 अनोळखी लोकं उभी होती. त्यांनी काय झाले? पैसे निघत नाहीत का? मी पैसे काढून देतो, असं सांगितलं. त्यातील एकाने मोहम्मद अफजल हुसेन यांच्या हातातील एटीएम कार्ड घेतले. व्यक्ती पैसे काढून देत असल्यामुळे त्याच्याकडे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला.
हातचालाखीने फसवण्याचा प्रकार -
एकाने डेबिट कार्ड हातचलाखीने बदलले आणि तसेच डेबिट कार्ड हुसेन यांना परत केले. त्यानंतर वेळोवेळी मोहम्मद हुसेन यांच्या बँक खात्यातून व्यक्तीने एकूण 3 लाख 22 हजार रुपये काढल्याचे हुसेन यांच्या मोबाईलवर मॅसेज आले. हुसेन यांनी पुन्हा बँकेत जाऊन चौकशी केली, त्यावेळी त्यांना त्यांच्या खात्यातून कोणीतरी एटीएम कार्ड वापरुन रक्कम काढली असल्याचे समजले.यानंतर हुसेन यांना धक्काच बसला आहे.अशिक्षित असल्यामुळे हुसेन यांना व्यक्तीने गंडवल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी मोहम्मद अफजल हुसेन यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.