मुंबई : कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम न झाल्याने लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. प्रचंड महागाईमुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या कलाकारांना मिळणार्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह आमदार वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली.
मुंबईसह कोकणातील भजन मंडळांची नोंद घेऊन त्यांनाही आर्थिक सहकार्य मिळावे. राज्यभरातील या कलाकारांची सांस्कृतिक विभागामार्फत नोंद घेण्यात येऊन त्यांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली.
दशवतारी, पालखी, नमन, भारूड, प्रवचनाकार हे कलाकार लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करतात, महाराष्ट्राची परंपरा जपतात. कोकणात शिमगा सण सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर या कलाकारांच्या मानधनाची घोषणा करा अशी मागणी राजन साळवी यांनी केली. सिंधुदुर्गातील असे कलाकार मोठ्या प्रमाणात असून त्यांची नोेंद घेण्यात यावी, अशी मागणी वैभव नाईक यांच्याकडून करण्यात आली.
शिवसेना आमदारांच्या या आग्रही मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी वृद्ध साहित्यिक, लोककलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात येईल. त्याचप्रमाणे भजनी मंडळांचीही नोंद केली जाईल. पावसाळी अधिवेशनाआधी हे प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही दिली.
स्थानिक कला सादर करणार्या कलाकारांची नोंद तसेच त्यांना आर्थिक सहकार्य करण्याबाबत सर्व आमदारांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या सूचना घेण्यात येतील. व्यापक चर्चा करून मार्गदर्शक तत्व ठरवली जातील व आर्थिक सहकार्याचा निर्णय घेतला जाईल. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विषय मार्गी लावला जाईल, असेही मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
#कोरोना प्रादुर्भाव आणि त्यामुळे आलेल्या निर्बंधाचा परिणाम म्हणून गेली दोन वर्ष #सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नाहीत.या परिस्थितीत अडचणीत आलेल्या राज्यातील कलाकारांना महाविकास आघाडी सरकारने जवळपास ४० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.१/२#MaharashtraBudgetSession #Culture #Art pic.twitter.com/5DpwCtWH39
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) March 8, 2022
कलाकारांना ३४ कोटींची मदत - अमित देशमुख
प्रतिवर्षी राज्यात २८ हजार सन्मानार्थी कलाकारांना मासिक मानधन मिळत आहे. याकरिता अंदाजे ९० कोटींची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येते. २०२१ साली काढलेल्या शासन निर्णयात मुंबई शहर, उपनगर, ठाणे व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी २००० आणि उर्वरित जिल्ह्यातील प्रत्येकी १५०० कलावंतांना अशा एकूण ५६ हजार कलावंतांना प्रत्येकी ५००० प्रमाणे एकूण २८ कोटी व प्रयोगात्मक कला सादरीकरण करणार्यांना ८४७ समूह, पथक, फड यांना एकूण ६ कोटी एक रकमी मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
ऑर्केस्ट्रा कलावंतांचाही समावेश करा - सुनील प्रभू
मुंबईसह राज्यात ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातूनही गायक, वादक, संयोजक हे उदरनिर्वाह करीत असतात. या कलावंतांची नोंदणीकृत संस्था नसल्याने त्यांची शासनदरबारी नोंद नाही. त्यामुळे या कलाकारांचीही नोंद करून त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी पात्र ठरविण्यात यावे.