Maratha Reservation : पुण्यामध्ये आज मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुंबई - बेंगळुरू महामार्ग तब्बल तीन तास रोखला. पुण्यातील नवले ब्रिजवर टायर जाळून वाहने अडवण्यात आली. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहंनाच्या दहा दहा किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा प्रचंड त्रास प्रवशांना सहन करावा लागला.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारलेले आहे. अंतरवाली सराटीमध्ये त्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. राज्यात ठीक-ठिकाणी विविध माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन मिळत आहे.
पुण्यामध्ये देखील जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण, कॅन्डल मार्च, मशाल मोर्चा अशा विविध माध्यमातून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्याचाच भाग म्हणून देहूरोड - कात्रज बाह्यवळण मार्ग तसेच नवीन बोगद्याकडे जाणार सातारा महामार्ग नवले पुलाजवळ रोखण्यात आला. शेकडोच्या संख्येने गोळा झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून वाहने अडवली. एक मराठा लाख मराठा तसेच एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देत वातावरण पेटवले. तब्बल दोन तासाने अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र ते मागे हटायला तयार नव्हते. आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. केवळ ॲम्बुलन्स आणि स्कूल बसेसना सोडण्यात येत होते. इतर वाहने मात्र एकाच जागेवर थांबून होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मनोज जरांगे पाटील यांनी सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचे आंदोलन करण्याचे आवाहन केलेले आहे. असे असताना रास्ता रोको का केला, यावर बोलतांना आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले. मराठा समाज वर्षांवरचे आरक्षणापासून वंचित आहे. समाजावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव सरकारला व्हावी यासाठी यासाठी आक्रमक आंदोलन छेडले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
घटनास्थळी उपस्थित पोलीस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कुठल्याच प्रकारे बळाचा वापर न करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली. सामान्य नागरिकांना त्रास होऊ देऊ नका असे आवाहन चर्चेच्या माध्यमातून आंदोलकांना करण्यात आले. त्यानंतर सुमारे दोन तासानंतर आंदोलनकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. सुरुवातीला छोटी वाहने सोडण्यात आली. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर रस्त्यावरील टायर बाजूला सारून मोठी वाहने सोडण्यात आली. दरम्यान रास्ता रोको मागे घेतल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत होत असतानाच काही कार्यकर्ते बैलगाड्या घेऊन रस्त्यावर आले. परंतु त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात रास्ता रोको केला आणि ते आंदोलन स्थळावरून निघून गेले. तब्बल तीन तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.