स्टॅम्प ड्युटी भरण्याइतके तरी व्हाईट पैसे आहेत का? चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

रस्ते घोटाळ्याप्रकरणी तक्रार करणार असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं, यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

Updated: Sep 13, 2021, 05:58 PM IST
स्टॅम्प ड्युटी भरण्याइतके तरी व्हाईट पैसे आहेत का? चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका title=

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना हसन मुश्रीप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही टीका केली होती. या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 

माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफ यांना झोप लागत नाही, किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ही त्यांची कार्यपद्धती आहे. काहीही झालं तरी शंभर-दोनशे कोटी रुपयांचा दावा करण्याची भाषा ते करतात. अलीकडच्या काळात इतके घोटाळे बाहेर येत आहेत, त्या तुलनेत शंभर कोटींच्या अब्रुनुसानीचा दावा ही तशी छोटी रक्कम आहे. त्यांनी पाचशे-हजार कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा लावला पाहिजे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. 

अब्रुनुकसानीचा दावा लावताना आपल्याला कोर्टामध्ये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, ती स्टॅम्प ड्युटी भरण्याइतके व्हाईट पैसे आहेत का, की लोकं वर्गण काढून देणार आहेत का हे पहावं, कारण ब्लॅक मनी त्याला चालत नाही, त्याला व्हाईट मनी लागतो, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. 

महाराष्ट्रात हॅम नावाचा ऐतिहासिक प्रोजेक्ट केला, ज्याचे रस्ते पूर्ण होण्याची उद्घाटन हे करत फिरतायत, तो एका अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी महाराष्ट्रात आणला, त्या प्रकल्पात घोटाळा आहे असं मुश्रीफ यांचं म्हणणं आहे. तर 19 महिने काय करत होते, झोपा काढत होते का? कोरोना काळात काळा पैसा गोळा करण्यात व्यस्त होतात का? असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, तुमची चुक नसेल तर तुम्ही घाबरता कशाला, असा प्रतिसवालही चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना विचारला आहे.