नितेश महाजन, झी मीडिया, जालना : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 200 खाटांच्यावर असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याची, माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शनिवारी राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात कोरोना हॉस्पिटलमध्ये 40 बेडच्या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
जुन्या ऑक्सिजन सिलेंडरवर आता निर्भर राहून चालणार नाही. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधील निधी वापरा किंवा आरोग्य विभागाकडून निधी दिला जाईल, असं टोपे म्हणाले. ऑक्सिजनची गरज वाढली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजनचे प्लॅन्ट टाकले पाहिजे, असं आम्ही बंधनकारक केलं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील लुबाडणूक टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करा, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं टोपे यांनी सांगितलं. महापालिका क्षेत्रांत आयुक्तांनी तर इतर भागात जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज 5 रुग्णालयांची तपासणी करावी. यासाठी शुक्रवारी सर्क्युलर जारी करण्यात आलं असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, जालन्यात आतापर्यंत 5760 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 3715 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जालन्यात कोरोनामुळे आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1878 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.