जालना : अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यातील ऊस पिकावर करपा सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पांढऱ्या माशीच्या अंडी आणि प्रौढ अवस्थेतील किडीमुळे हा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दलदलीच्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतोय.
पिकाच्या पानाच्या खालच्या बाजूस गोल,नाजूक,पांढरट पिले आणि कोष दिसतात.ही कीड पानातील रस शोषून घेत असल्याने ऊस उत्पादनात व साखर उताऱ्यात घट येत असल्याचा निष्कर्ष जिल्हा कृषी विभागाने काढलाय.ऊस पिकात सतत पाणी साचत असल्यास चर खोदून साचलेलं पाणी शेतीबाहेर काढावं असं आवाहन कृषी विभागाने केलंय.
दरम्यान या करपा सदृश्य रोगामुळे ऊसाला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळत नसल्याने २५ ते ३० टक्के घट येण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत असून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू असं आश्वासन कृषी सहसंचालकांनी दिलंय.
शिवाय या रोगाला नियंत्रीत करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने ऊसावर हिमिराक्लोरोपीट या औषधाची फवारणी करावी असंही आवाहन त्यांनी केलंय.