...म्हणून प्राध्यापकांच्या पगाराच्या आकडे दिसतायत कॉलेज बोर्डवर

शिक्षण संस्था चालकांनी प्राध्यापकांच्या पगाराच्या आकड्यांचा बोर्ड का लावला ?

Updated: Dec 2, 2019, 07:13 PM IST
...म्हणून प्राध्यापकांच्या पगाराच्या आकडे दिसतायत कॉलेज बोर्डवर

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : बदनापूर येथील एका महाविद्यालयात खुद्द शिक्षणसंस्था चालकांनी महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापकांच्या पगाराचे आकडे एका बोर्डवर लावले आहेत. महाविद्यालयाच्या स्वागत कक्षात हा बोर्ड लावल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येकांचं लक्ष वेधून घेतोय. शिक्षण संस्था चालकांनी प्राध्यापकांच्या पगाराच्या आकड्यांचा बोर्ड का लावला याबद्दल शहरात चर्चा सुरु आहे.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राचार्य आणि प्राध्यापकांचे पगार किती झाले ? असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या मनात उपस्थित झाला असेल. पण प्राध्यापकांना नेमका पगार किती हे आपण त्यांना विचारू शकत नाही आणि त्यांना विचारल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. पण सर्वसामान्यांच्या या प्रश्नाचं उत्तर जालना जिल्ह्यातील बदनापूरच्या निर्मल क्रिडा आणि समाज प्रबोधन ट्रस्ट कडून चालवल्या जाणाऱ्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात गेल्यानंतर मिळते. या महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापक लोकांना किती पगार मिळतो याचे आकडेच महाविद्यालयाच्या स्वागत कक्षात एका लाल बोर्डवर लावले गेलेत.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर प्राध्यापकांना देखील त्याचा फायदा झाला आणि त्यांच्या पगारात भरमसाठ वाढ झाली. या महाविद्यालयात शिकवणाऱ्या 4 प्राध्यापकांचा पगार थेट 1 लाख 78 हजार रुपयांवर गेल्याचं पाहायला मिळतं. प्राध्यापकांना मिळणाऱ्या अशा भरमसाठ पगारामुळे विद्यार्थ्यांनी डॉक्टर, वकील आणि इंजिनीअरिंग ऐवजी प्राध्यापक होण्याचा संकल्प करावा असं शिक्षण संस्था चालकांना वाटतं. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमित हजेरी लावावी आणि प्राध्यापकांना मिळणाऱ्या पगाराचा ते देत असलेल्या ज्ञानाचा पुरेपूर फायदा घ्यावा यासाठीच हा अट्टाहास केल्याचं शिक्षण संस्था चालकांनी म्हटले आहे.

शिक्षण संस्था चालकांनी प्राध्यापकांच्या पगाराचे आकडे महाविद्यालयाच्या स्वागत कक्षात बोर्डवर लावले हे जरी खरं असलं तरी बोर्ड लावण्याचं खरं गौड बंगाल महाविद्यालयातील एका प्राध्यापकांने उघड केलंय. या शिक्षण संस्थेत शिकवणारे प्राध्यापक लाख मोलाचा पगार घेत असले तरी ते तेवढी शिकवणी घेत नसल्याचा प्राध्यापकांवर आरोप आहे. तर महाविद्यालयात शिकवणी घ्यायला विद्यार्थीच येत नसल्याचं प्राध्यापकांचं म्हणणं आहे.

महाविद्यालयात परीक्षे दरम्यान कॉप्यांचा प्रकार चालतो त्यामुळे विद्यार्थीच शिकवणीसाठी महाविद्यालयात न येता थेट परीक्षेला येतात असं प्राध्यापकांचं म्हणणं आहे.याशिवाय शिक्षण संस्था चालक प्राध्यापकांकडे पैशाची मागणी करतात आणि त्यांना पैसे न दिल्यास ते अशा प्रकारचा गेम खेळतात असंही गौडबंगाल उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. 

शिक्षण संस्था चालक आणि प्राध्यापक यांच्या या वादात विद्यार्थी मात्र चांगलाच धडा घेतायत.आमच्या प्राध्यापकांना लाख मोलाचा पगार मिळतो हे माहीत झाल्यानंतर आपणही शेतकरी, डॉक्टर आणि इंजिनिअर ऐवजी प्राध्यापक व्हावं असं त्यांना वाटू लागले आहे.

प्राध्यापकांच्या पगाराचे आकडे बोर्डवर लावण्यावरून या महाविद्यालयातील वातावरण गरम झाले पण अशाही वातावरणात विद्यार्थ्यांनी जो बोध यातून घ्यायचा तो घेतला. या महाविद्यालयात प्राध्यापक आणि शिक्षण संस्था चालकांचा वाद थेट विद्यापीठात जुना झाले आता या पगाराच्या आकड्याचा वाद कुठपर्यंत पोहचतो हे देखील आता पाहावं लागेल.