वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : म्हणतात 'ना देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात पाहिला मिळाला. चोपडा तालुक्यातील कोळंबा इथं घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. बिबट्या समोर दिसल्याने एका महिलेने चक्क नदीच्या पात्रात उडी मारली. पाण्याच्या प्रवाहात तब्बल साठ किलोमीटर पोहत या महिलेने आपला जीव वाचवला.
काय आहे नेमकी घटना?
चोपडा तालुक्यातील कोळंबा इथल्या रहिवासी लताबाई दिलीप कोळी शुक्रवारी म्हणजे 9 सप्टेंबरला तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. चोपडा तालुका म्हटलं म्हणजे डोंगराळ भाग. इथं हिंस्त्र प्राण्यांचा नेहमीच वावर पाहिला मिळतो. लताबाई शेंगा तोडत असताना त्यांना बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठिमागे पळत असलेला दिसला. बिबट्या आपलीही शिकार करेल या भीतीने लताबाईंनी थेट दुथडी भरून वाहत असलेल्या तापी पात्रात उडी घेतली.
बिबट्याच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी लताबाईंनी पाती नदीत उडी मारली आणि पाण्याच्या प्रवाहात त्या तब्बल 60 किलोमीटर पोहत गेल्या. अंमळनेर तसंच पाडळसरे धरण ओलांडून त्या थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर पोहोचल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला इथल्या नाविकांना लताबाई एका केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
त्यांनी तात्काळ लताबाईंना बाहेर काढलं. त्यानंतर लताबाईंना मारवड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. लताबाईंनी दाखवलेल्या या धैर्यांची राज्यभरात चर्चा सुरु आहे.