जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातच पाण्यासाठी अबाल वृद्धांच्या रांगा

 जलसंपदा खातं त्यांच्याकडे असूनही गेल्या चार वर्षात पाणी टंचाईवर त्यांना तोडगा काढता आलेला नाही.

Updated: May 25, 2018, 08:29 AM IST
जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातच पाण्यासाठी अबाल वृद्धांच्या रांगा  title=

जामनेर : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्याला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावात पाण्याचा टँकर आल्यानंतर घरातल्या लहानग्यांपासून -वृद्धापर्यंत सर्वच जण टँकरसमोर भांडी घेऊन मोठ्या रांगा लावतात. प्रसंगी लोकांमध्ये पाण्यासाठी झुंबड तर उडतेच पण भांडणंही होतात. जलसंपदा मंत्री हे टँकरवर स्वत:चे मोठ-मोठे फोटो लावून  जनसेवेचा आव आणण्यात दंग आहेत. स्वत:च्या तालुक्यात जलसंपदा आणू शकत नाही ते राज्याचे काय भले करणार ? अश्या खोचक प्रतिक्रिया जनतेमध्ये ऐकू येत आहेत.

पाणी टंचाईवर तोडगा नाही  

 गेल्या पंचवीस वर्षांपासून जामनेर तालुक्याचे आमदार असलेले गिरीश महाजन हे वीस वर्षे विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळत नसल्याचा डांगोरा पीटत होते.  मात्र आता ते केवळ सत्तेत नसून  अत्यंत महत्त्वाचं जलसंपदा खातं त्यांच्याकडे असूनही गेल्या चार वर्षात पाणी टंचाईवर त्यांना तोडगा काढता आलेला नाही.