भाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य

'शिवसेनेच्या बाबतीत दगडापेक्षा वीट मऊ अशी कार्यकर्त्यांच्या मनात भावना आहे'

Updated: Nov 17, 2019, 04:40 PM IST
भाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य title=

अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : भाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. त्यामुळे, आता राष्ट्रवादीची नवी सोयरिक जुळणार का? अशीही चर्चा सुरू झालीय. 'ज्यांच्याविरोधात लढलो त्या भाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत. मात्र, शिवसेनेच्या बाबतीत दगडापेक्षा वीट मऊ अशी कार्यकर्त्यांच्या मनात भावना आहे. राज्यात सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. अजून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील' असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

जयंत पाटील पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजपामध्ये गेलेले आणि काही अपक्ष संपर्कात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी, भाजपाबरोबर जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटलांना केला असता 'भाजपासोबत जाण्याला काही मर्यादा असल्याचं' त्यांनी म्हटलं. आम्ही ज्यांच्याविरुद्ध लढलो त्यांच्यासोबत विचारधारा वेगळी असल्यानं जाणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं... 'मग शिवसेनेसोबत कसं जाणार?' असा पुढचा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावेळी 'दगडापेक्षा वीट मऊ' या वाक्प्रचाराचा वापर करत जयंत पाटलांनी 'अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचं' स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्या अगोदर आज राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक शरद पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेबरोबर कशा पद्धतीनं पुढे जायचं याविषयी महत्त्वाचा निर्णय होणार असं वाटत असतानाच 'अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही' अशी पुश्ती जयंत पाटील यांनी जोडलीय.

दुसरीकडे शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा आज संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलीय. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रात ते काँग्रेसशी जुळवण्याचा प्रयत्न त्यामुळे त्यांना विरोधी बाकांवर जागा देण्यात येत आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. अर्थात शिवसेना-भाजपाचा घटस्फोट झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय.