परतीच्या पावसाने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल

परतीच्या पावसाने उभं पीक वाया गेलं.

Updated: Nov 17, 2019, 03:04 PM IST
परतीच्या पावसाने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल

हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : शेतात दिवस-रात्र काबाडकष्ट करुन उभा केलेला शेतमाल क्षणार्धांत परतीच्या पावसाने हाहाकार माजवल्याने नष्ट झाला. गेल्या महिन्याभरापासून पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं आहे. मांडगण फराटा येथील शेतकरी पंडितराव फराटे यांना शेतात पाच एकर शेतीमध्ये पाच लाख रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड केली आणि परतीच्या पावसाने उभं पीक वाया गेलं. त्यामुळे मोठ्या भांडवली खर्चातून उभ्या केलेल्या पिकाची नुकसान भरपाई कधी मिळणार या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

पंडितराव फराटे यांनी पाच एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोची जपवणूक करून टोमॅटो काढणीला आला आणि परतीच्या पावसाने टोमॅटोचे पीक पाण्याखाली गेलं. काही दिवसांपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली आणि शेतकरी संकटात सापडला. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय नेते आपल्या सत्तास्थापनेत व्यस्त आहे. शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी आपल्या शेतीची नुकसान भरपाई कशी मिळणार या विवंचनेत अडकला आहे. 

  

संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक गणित शेतीवर अवलंबून असताना मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेलं टोमॅटोचं पीक आज वाया गेलं. काही दिवसांपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली. नुकसान भरपाईचे पंचनामे झाले, मात्र प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची भरपाई कशी व कोण देणार हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.