मुंबई: राज्य सरकारने वेळीच मराठा समाजाचं समाधान केलं असतं तर आज मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली नसती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला.
यावेळी त्यांनी म्हटले की, सरकार वेगवेगळी कारण सांगून आरक्षणाला विलंब करतेय हे वाटत असल्यामुळे मराठा समाजाच्या भावना विकोपाला पोहोचल्या आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. एखाद्या समाजाने स्वत:हून मुद्दा हातात घेतला तर त्याचे राजकारण होत आहे, अशी ओरड केली जाते. याउलट मराठा समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन वेळीच त्यांचं समाधान केलं असतं तर आजची वेळ ओढावली नसती. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबामुळे मराठा, धनगर आणि लिंगायत समाजात सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरलेय, हा संदेश गेल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आषाढीला पंढरपुरात जमलेल्या सुमारे १० लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट काही लोकांनी आखला आहे. त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच महापूजेला जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. वारकऱ्यांना अशाप्रकारे वेठीला धरणं चुकीचं आहे. असं करणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊच शकत नाही, असा टोलाही फडणवीसांना लगावला.