Surat Lok Sabha : "नरेंद्र मोदींनी 'मॅच फिक्सिंग' केली अन्...", जितेंद्र आव्हाडांनी थेट क्रॉनोलॉजी सांगितली

Jitendra Awhad On Surat Lok Sabha : सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवल्याने आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.  

सौरभ तळेकर | Updated: Apr 22, 2024, 10:46 PM IST
Surat Lok Sabha : "नरेंद्र मोदींनी 'मॅच फिक्सिंग' केली अन्...", जितेंद्र आव्हाडांनी थेट क्रॉनोलॉजी सांगितली title=
Surat Lok Sabha, Jitendra Awhad

BJP Surat Lok Sabha : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपचा पहिला विजयी उमेदवार समोर आला आहे. सुरत लोकसभेच्या जागेवर भाजप उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) बिनविरोध निवडून आले. इथले काँग्रेस उमेदवार निलेश कुम्भानी (Nilesh Kumbhani) यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. तर इतर 8 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुकेश दलाल मतदान आणि निकालापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. सूतरमधील प्रकारानंतर आता देशभरातून यावर टीका होताना दिसत आहे. अशातच 'लोकशाही कशी धोक्यात आहे याची क्रोनोलॉजी समजून घ्या', असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) भली मोठी पोस्ट लिहिली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

सुरतमध्ये काँग्रेसचे पहिले उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर सुरतमधून काँग्रेसच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर भाजप उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले की मागे घेण्यास भाग पाडले गेलं? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे. मग सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना 'बिनविरोध' विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोग वारंवार सांगतो की सर्वांना समान संधी आणि न्याय मिळाला पाहिजे, परंतु तेदेखील सत्ताधा-यांच्या हातातले बाहुले झाले आहेत. अन्यथा ही परिस्थिती उद्भवली नसती, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

हा सर्व प्रकार 'मॅच फिक्सिंग' आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत कारण सध्या ते बिथरले आहेत. दहा वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांच्याकडे मतदारांना सांगण्यासारखे काही नाही. भाजपच्या उमेदवारांचे तर काहीच कर्तृत्व नाही. मोदींकडे निवडणूक सभांमध्ये बोलण्यासाठी काही नाही म्हणून ते हिंदू-मुसलमान या मुद्याकडे वळले आहेत. उमेदवारी भरण्याच्या पातळीवरच सर्व यंत्रणा मॅनेज करूनच ही लोकं '400 पार'चा नारा देत आहेत. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हुकूमशहाचा खरा 'चेहरा' पुन्हा एकदा देशासमोर आलाय. जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार काढून घेणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ही केवळ सरकार स्थापनेची निवडणूक नाही, ती देश वाचवण्याची निवडणूक आहे, संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.