साहेब आमच्या पप्पाला तुम्ही समजून सांगा; तिसरीतल्या धनश्रीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कडकनाथ घोटाळ्यात शेतकऱ्यांची फसवणूक 

Updated: Jan 22, 2020, 11:15 AM IST
साहेब आमच्या पप्पाला तुम्ही समजून सांगा; तिसरीतल्या धनश्रीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

उस्मानाबाद : कडकनाथ घोटाळ्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याचं दिसत आहे. कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी कोल्हापुरात गेल्यानंतर आता या संबंधी एका तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

कडकनाथ घोटाळा प्रकरणात अनेक शेतकऱ्यांना फसवण्यात आलं. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी लाखोंची गुंतवणूक केली आहे. अशी फसवणूक उस्मानाबादमध्ये देवळाली येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गाला शिकणाऱ्या धनश्री बिक्कडने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कडकनाथ घोटाळ्यात पप्पांची फसवणूक झाली असून त्यांच संकट दूर करा असा मचकूर या मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. (कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी, तरुणाची आत्महत्या

तिसरीत शिकणाऱ्या धनश्रीचं मुख्यमंत्र्यांना भावूक पत्र

श्री. मुख्यमंत्री साहेब आपणास सा. नमस्कार 
सर्वात पहिले तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
माझे नाव धनश्री आश्रुबा बिक्कड आहे. मी तिसरी वर्गात जि.प.प्रा. शाळा देवळाली ता. कळंब येथे शिकत आहे. साहेब माझे पप्पा शेतकरी आहेत. पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्या वेळेला पाऊसच नसतो. मग शेतात काही धान उगवत नाही. माझे पप्पा नेहमी टेन्शनमध्ये असतात सारखे चिडचिड करतात. मम्मीवर रागवतात. माझ्यावर पण चिडतात. त्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो त्या कडकनाथ घोटाळ्याने वाटोळं केलं. कडकनाथ कोंबड्याच्या घोटाळ्यात लय पैसं आडकलं नेहमी मेमेल बरं मरणाशिवाय आता दुसरा पर्यायच नाही असच सारख बोलतात. साहेब मला लय घाबरायला होते मला फार भिती वाटते आमच्या शाळेत वाचण्यासाठी पेपर योतो त्यात पण शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बातम्या येतात. साहेब आमच्या पप्पाला तुम्ही समजून सांगा. त्यांना त्या कडकनाथ कोंबड्यासाठी दिलेले पैसे परत मिळवून द्या. प्लिज माझ्या पप्पाला मदत करा आमच्या सरांनी सांगितल की, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी 26 जानेवारी निमित्त शुभेच्छा पाठवा म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहिले. चुक भूल माफ करा. 

तुमची विश्वासु 
धनश्री आश्रुबा बिक्कड इ.3 री 
जि.प.प्रा. शाळा देवळाली ता. कळंब जि. उस्मानाबाद