कल्याणचा 104 वर्षे जुना पत्री पूल आज इतिहासजमा होणार

 हजारो टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी दोन अजस्त्र क्रेन मागवल्या आहेत.

Updated: Nov 18, 2018, 08:31 AM IST
कल्याणचा 104 वर्षे जुना पत्री पूल आज इतिहासजमा होणार  title=

कल्याण : कल्याणमधला १०४ वर्षं जुना पत्री पूल आज इतिहासजमा होणार आहे. वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर करण्यात आल्यानं हा पूल पाडण्यात येणार आहे. यासाठीची तयारी रेल्वे प्रशासनानं युद्धपातळीवर केली आहे. सकाळी साडे नऊ वाजता पत्री पुलाचा गर्डर उचलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत हे काम चालेल. हजारो टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी दोन अजस्त्र क्रेन मागवण्यात आल्या आहेत.

जादा बसेस सोडणार 

पत्री पुलाचा गर्डर मूळ पायापासून वेगळा करुन ठेवण्यात आलाय. या सहा तासांच्या मेगा ब्लॉकदरम्यान केडीएमसी परिवहन कल्याण ते डोंबिवली, तसंच विठ्ठलवाडी ते डोंबिवली अशा जादा बसेस सोडण्यात येणार आहे.  

मेल, एक्सप्रेसवर परिणाम 

या कामामुळे सकाळी ९.१५ ते दुपारी ३.४५ या कालावधीत जम्बोब्लॉक घेतला जाणार असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होणार आहे.

या कालावधीत कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

या ब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेस सेवेवर परिणाम होणार आहे.