कसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन?

पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार? बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं

Updated: Feb 7, 2023, 09:46 PM IST
कसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन? title=

By Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका (Kasba-Chichwad By Election) लढवायचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला खरा. मात्र बंडखोरीमुळं मविआच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांचं विशेषतः अजित पवार (Ajit Pawar) यांचं टेन्शन वाढलंय.. चिंचवडमध्ये भाजपनं दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिलीय. तर राहुल कलाटे (Rahul Kalate) राष्ट्रवादीकडून (NCP) निवडणूक लढवायला इच्छुक होते. मात्र त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीनं नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कलाटेंनी बंडाचं निशाण फडकावलं. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानं अजित पवारांची डोकेदुखी वाढलीय.

कलाटेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी नेत्यांनी सुरू केलेत. पण कलाटे माघार घ्यायला तयार नसल्यानं चिंचवडमध्ये भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष अशी काटे की टक्कर रंगणार आहे. 2019 च्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेकडून बंडखोरी केलेले उमेदवार राहुल कलाटे यांना मिळाली होती, त्यामुळे या जागेवर शिवसेनेकडूनही दावा केला जात होता.

चिंचवड इथल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयात उमेदवार नको, आयात उमेदवार दिल्यास पक्षाचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली होती, त्यामुळे राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याने नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली.

कसबा मतदारसंघातही बंडखोरी
दुसरीकडं कसबा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या विरोधात बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केलीय.. या बंडखोरीमुळं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय. एकीकडं भाजपनं टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न दिल्यानं हिंदू महासंघाचे आनंद दवेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. तर दुसरीकडं काँग्रेसमध्ये धंगेकर विरुद्ध दाभेकर असा सामना रंगणाराय... या बंडाळीमुळं पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार तर नाहीत ना...? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x