सातारा : जिल्ह्यातला खटाव दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी विविध संघटनातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात शोलेस्टाईल आंदोलन केले. खटाव तालुक्यातील 144 गावांपैकी 119 गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. असे असताना शासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेला अहवाल हा खोटा असून त्यामुळे खटाव तालुका दुष्काळी तालुक्याच्या यादीतून गायब झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले.
गावाच्या पाण्याच्या टाकीवर ही ग्रमस्थ मंडळी चढून जो पर्यंत जिल्हाधिकारी या ठिकाणी येत नाहीत आणि आमचे म्हणने एेकून घेत नाहीत तो पर्यंत आम्ही खाली उतरणार नाही अशी भूमिका या आंदोलक ग्रामस्थांनी घेतली आहे. टाकीवर चढलेल्या ग्रामस्थांनी शासनाच्या विरोधात आणि शासकीय कर्मचा-यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.
घटनास्थळी प्रांताधिकारी आणि पोलिस अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. त्यांना विनवनी करुन त्याना खाली उतरवण्याचा प्रयत्न यांचा सुरु आहे मात्र आंदोलक एेकण्याच्या मनस्थितीत नाहीत. सध्या पोलीस अधिकारी पाण्याच्या टाकीवर चढले आहेत आणि ते या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत आहेत.