मित्रासाठी केल बालिकेच अपहरण

परराज्यातील टोळी सक्रीय असल्याचा संशय ...

Updated: Aug 12, 2022, 07:32 PM IST
मित्रासाठी केल बालिकेच अपहरण  title=
सुटका करण्यात आलेली चिमुकली आणि वडील सोबत संशयित आरोपी

योगेश खरे, नाशिक-  मुलबाळ होत नाही म्हणून मित्राच्या पत्नीला आणि मित्राला कौटुंबिक सुख नाही. त्याची मुलबाळ होण्यासाठीचा खर्च आणि वणवण बघता चक्क मित्रानेच दहा महिन्याच्या बालिकेचे अपहरण केल्याची घटना नाशिकमध्ये उघड झाली आहे. सोमवारी  बालिका बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या  वडिलांनी पंचवटी पोलीस ठाण्यात केली होती. त्या तपासात संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

कसे केले अपहरण

सोनी पवार आणि युवराज पवार यांना दहा महिन्याची मुलगी आहे. पवार कुटुंब आदिवासी तालुका असलेल्या सुरगाणा तालुक्यातील निवासी आहेत. सध्या उदरनिर्वाहासाठी ते नाशिकमध्ये मोलमजुरी करून रोजीरोटी मिळवीत आहेत. मात्र राहण्याची सोय नसल्याने नाईलाजाने रात्रीचा मुक्काम गोदाघाटावरच होतोय. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पवार यांची मुलगी गौरी पटांगण येथे खेळत होती. याचवेळी संशयित आरोपी मकरंद भास्कर पाटील हा गौरी पटांगण येथे फिरायला आला होता. याठिकाणी पवार यांच्या मुलीला एका मुलीसोबत खेळताना पहिले. तिच्या सोबत एक महिला देखील होती. मात्र काही कामानिमित्त ही महिला तेथून निघून गेली. यानंतर  मुलीला एकटे खेळत असल्याचे पाहून संशयित मकरंद याने मुलीला पळवून नेले. आईला आपली मुलगी दिसत नसल्याच लक्षात आल. यानंतर आजूबाजूला चौकशी केली असता मुलगी मिळून आली नाही. अखेर वडील युवराज पवार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

असा लागला शोध

चिमुकलीला घेऊन जातांना एका व्यक्तीने बघितले होते याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरवात केली. सीसीटीव्ही चा माग काढत मुलगी सातपूर परिसरात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. यात सखोल तपास करतांना प्रसंगावधान राखत  मुलगी एका घरात मिळून आली. यावेळी संशयित आरोपी मकरंद पाटील याला पोलिसांनी अटक केली.

या कारणासाठी केले मुलीचे अपहरण

 संशयित मकरंद याला विचारणा केली असता त्याने मुंबई येथील मित्राला मुलबाळ नसल्याने त्याला ही मुलगी विक्री करण्यासाठी अपहरण केल्याची कबुली दिलीये. शहरातील इतर अपहरणात मकरंद याचा हात आहे का याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

गेल्याच आठवड्यात लग्नासाठी मुलीचे अपहरणाचा प्रकार घडला होता. नाशिक जिल्ह्यातील ओझर येथून १४ वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली होती. तपासात मुलीचे अपहरण करून तिचे परराज्यात लग्न लावून देणारी टोळी कार्यरत असल्याच उघड झाल होत.

नाशिक शहरात दररोज तीन ते चार अल्पवयीन मुलींचे अपहरण होत आहेत. अपहरणाची वाढती संख्या बघता यामागे परराज्यातील टोळी असल्याचा संशय पोलिसांना असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.