'कपाळावर हात मारला, कोन बांडगुळ हाय ते.. लै अवलादी...', किरण माने यांची पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post on manusmruti : एकीकडे जितेंद्र आव्हाड यांचं प्रकरण ताजं असताना आता किरण माने यांनी केलेली पोस्ट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नेमकं किरण माने यांनी काय म्हटलं?

सौरभ तळेकर | Updated: May 30, 2024, 08:40 PM IST
'कपाळावर हात मारला, कोन बांडगुळ हाय ते.. लै अवलादी...', किरण माने यांची पोस्ट चर्चेत title=
Kiran Mane Social Media Post on manusmruti

Kiran Mane Social Media Post :  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. प्रकरण लक्षात आल्यावर त्यांनी माफी देखील मागितली होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा विषय उचलून धरल्याने प्रकरण तापलं आहे. अशातच किरण माने (Kiran Mane) यांनी यावर पोस्ट केलीये. जितेंद्र आव्हाडांकडून अनवधानानं जी चूक झाली ती गंभीरच होती. डॉ. आंबेडकरांनी 'मनूस्मृती' जाळल्याची आठवण पुन्हा ताजी व्हावी हा हेतू स्तुत्य होता. पण अशा आंदोलनात जे करायचे आहे त्याची योग्य ती खबरदारी न घेतल्याचा रागही आला. आव्हाडांनी माफी मागीतली इथं विषय संपला खरंतर... पण त्यानंतरही यांचा जो थयथयाट सुरू आहे तो फार विनोदी आहे, असं म्हणत किरण माने यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच त्यांनी मनुस्मृतीवर (Kiran Mane Post on manusmruti) आपल्या भाषेत एक पोस्ट केलीये. 

किरण माने यांनी पोस्टमध्ये काय लिहिलंय?

'मनुस्मृती' लिहीनारं भृगू का कोन बांडगुळ हाय ते लै अवलादी असणार यात शंका नाही... आजकाल एक नग हाय बघा...जो काल एक बोलतो आणि आज बरोब्बर त्याच्या विरूद्ध बोलतो... आन् उद्या तिसरंच कायतरी बरळतो ! तसंच ते मनुस्मृती लिहीनारं किरानीष्ट बोड्याचं बेनं असनारंय. परवा एका भगिनीनं मनुस्मृतीतला एक श्लोक ऐकवला 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता' ! जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं देवताही रमतात. ती पुढं म्हन्ली, "इतका मान स्त्रियांना दिलाय मनुस्मृतीत. तुम्ही जातीयवादी आहात म्हणून तुम्हाला कळत नाहीये." व्हॉटस् ॲप युनिव्हर्सिटीचा हा कचरा बघुन मी कपाळावर हात मारून घेतला, असं पोस्टमध्ये माने यांनी लिहिलंय.

तिला म्हन्लं, "ताई, स्त्री आणि शुद्रांना अक्षरश: किड्यामुंगीपेक्षा बेकार वागणूक देणार्‍या मनुस्मृतीतल्या एका श्लोकावर इतकी खुश होऊ नकोस." मग मी तिला लिस्टच दिली. मनुस्मृतीतला अध्याय दुसरा. श्लोक नंबर २१५. तिथं त्यानं लिहीलंय, "शृंगार, म्हणजेच नटणेमुरडणे करून पुरूषांना मोहित करणे हा स्त्रीस्वभाव आहे. माणूस सज्जन असो वा दुर्जन, त्याला वासनेच्या जाळ्यात अडकवण्यात स्त्रिया तयारीच्या असतात. त्यामुळे पुरूषाने तिला फार किंमत देऊ नये. स्वतःची आई-बहीण किंवा मुलीशीसुद्धा फार जवळ जाऊन अथवा एकांतात बसून बोलू नये !" दुसर्‍या अध्यायातल्याच २४६ व्या श्लोकात हा बाबा म्हन्तो, "सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तर तिला भोगण्यात कुठलेही पाप नाही", असं किरण माने पोस्टमध्ये म्हणतात.

पाचव्या अध्यायात तर त्यानं दांडगा धुमाकुळ घातलाय. मनूवाद्यांना साथ देणार्‍या प्रत्येक भगिनीनं ते वाचावं असं हाय. १४८ ते १५५ व्या श्लोकांमध्ये हा सांगतो, "बाईनं बालपणी पित्याच्या आज्ञेनं वागावं. तिनं कधीच स्वतःच्या मतानं वागू नये. पिता, पती, पुत्र यांच्या ताब्यात न रहाणारी, स्वतंत्र विचाराची स्त्री ही दोन्ही घराण्यांना कलंक असते. पतीनं कितीही छळ केला तरी पत्नीनं हसतमुखानं राहावे. आपल्या वडिलांनी ज्याच्याशी आपलं लग्न लावलंय तो कसाही असो... जिवंत असेपर्यंत बाईनं त्याचीच सेवा करावी. त्याच्या मरणानंतरही तिने दुसरा नवरा करू नये. नवरा व्यसनी, जुगारी, बाहेरख्याली असला... अडाणी असला... अपंग असला तरी तिने त्याला देवासामान मानावे ! पती निधनानंतर बाईने कमी जेवण करावे. शरीरसुखापासून अलिप्त रहावे. तरच तिला स्वर्ग मिळेल."

याहून खतरनाक घृणास्पद गोष्टींनी खचाखच भरलेला हा ग्रंथ आहे. उगाच नाही पुस्तकांवर जीव असनार्‍या डॉ. बाबासाहेबांनी तो ग्रंथ जाळला. एकजात सगळ्या हिंदू स्त्रियांना गुलाम ठरवनार्‍या ह्या नीच - विषारी ग्रंथाचा कुनी कितीबी उदोउदो करूद्या... त्याला भुलू नका. खोलात जाऊन अभ्यास केलात तर तुम्हाला कळंल की कुस्तीगीर महिलांचं शोषण करणार्‍या ब्रिजभूषणपास्नं ते तीन हजार महिलांवर बलात्कार करणार्‍या प्रज्वल रेवण्णापर्यन्त सगळे नराधम लोक मनुस्मृती मानणार्‍या जनावरांच्या नजरेत निर्दोष ठरतात. हे तुम्हाला मान्य आहे??? तुमच्या मुलांना मनुस्मृतीची शिकवण द्यायची की शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांनी त्यांना समृद्ध करायचे हे तुम्ही ठरवा, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.