मुंबई | कोरोना लसीकरणाबाबत (Corona Vaccintaion) नकारात्मक विधान करणारे ख्यातनाम कीर्तनकार इंदोरीकर (Kirtankar Indorikar Maharaj) महाराज यांना अखेर उपरती झालीय. आपण कोरोना लस घेणार नाही, असं सांगणारे इंदोरीकर महाराज आता चक्क आपल्या कीर्तनातून लसीकरणाबाबत जनजागृती करू लागले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister) यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. त्यानंतर महाराजांनी लसीकरणाचा प्रचार आणि प्रसार आता हटके स्टाईलनं सुरू केला आहे. (kirtankar indorikar maharaj to started corona vaccination awarness after meets to health minister rajesh tope at jalna)
जालन्यातील वाकुळणी येथे 20 नोव्हेंबरला इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होतं. या किर्तनस्थळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदोरीकरांची भेट घेतली. या भेटीत लसीकरणाबाबत नकारात्मक विधान करणाऱ्या इंदोरीकरांना टोपे यांनी 'डोस' दिला. त्यानंतर आता कीर्तनातून लसीकरणाबाबत आवाहन करणार असल्याचं शब्द इंदोरीकरांनी टोपेंना दिला. त्यानुसार आवाहन करायला सुरुवातही केली.
इंदोरीकर महाराज काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात इंदोरीकर महाराजांनी लसीकरणाबाबत नकारात्मक विधान केलं होतं.
"प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी असते. प्रत्येकाची मेंदूची क्षमता ही वेगवेगळी असते. मी तर लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही. लस घेतल्याने काही होतत नाही तर घेऊन काय करणा. कोरोनावर एकच औषध आहे ते म्हणजे मन खंबीर ठेवा", असं इंदोरीकर महाराज म्हणाले होते.
इंदोरीकर महाराजांचा राज्यासह विविध भागात मोठा फॅन फॉलोईंग आहे. त्यांना मानणार मोठा वर्ग आहे. त्यांच्या कीर्तनाला हजारोने लोकं उपस्थित असतात. मात्र त्यांनी केलेल्या नकारात्मक विधानामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र ते आता जनजागृती करणार असल्याने त्यांना उपरती झाली आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरु नये.