कोरोनामुळे मृत्यू झाल्याने थेट डॉक्टरांवर चाकू हल्ल्याने राग

लातूर शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर खाजगी डॉक्टरवर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

Updated: Jul 29, 2020, 03:17 PM IST
कोरोनामुळे मृत्यू झाल्याने थेट डॉक्टरांवर चाकू हल्ल्याने राग title=

लातूर : लातूर शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर खाजगी डॉक्टरवर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील महिलेचा कोरोनामुळे आज पहाटे मृत्यू झाला. त्याचा राग मनात धरून मृत महिलेच्या मुलाने हा चाकू हल्ला केला. 

यात डॉक्टर दिनेश वर्मा यांच्या छातीवर, मानेखाली आणि हातावर चाकूचे वार झाले आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून त्यांच्यावर लातूरच्याच कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

नटवरलाल सगट असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान डॉक्टरांवरील हल्ल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूरने या हल्ल्याचा निषेध केलाय. 

तसेच लातूरच्या ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत तिथे पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खचले असल्याची भावना आयएमएच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. 

या घटनेविषयी बोलताना डॉ. विश्वास कुलकर्णी जे आयएमए, लातूरचे अध्यक्ष आहेत, ते म्हणाले,  'दिनेश वर्मा यांच्यावर हा हल्ला झाला. कोरोनामुळे आई ऍडमिट होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी हल्ला केलाय. 

सुदैवाने ते धोक्याच्या बाहेर आहेत. यामुळे डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण झालं आहे. कोविड सारख्या परिस्थितीत डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना असा हल्ला झाल्यामुळे कोविड हॉस्पिटलला पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशी आमची मागणी आहे. गुन्हेगारांना शिक्षा होईल असे आश्वासन दिलंय. सर्वानी मिळून याचा सामना करू या. '