प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या शिक्षकाला (Teacher) अखेर तीन महिन्यांनी अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील विद्यालंकार शेळेवाडी इथला नराधम शिक्षक व्ही.पी बांगडी याला कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) बेड्या ठोकल्या आहेत. शाळेतील मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवत विनयभंग केल्याची तक्रार मिळाल्यानंतर शिक्षकाची केवळ बदली करण्यात आली होती. मात्र पालकांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर आता या नराधम शिक्षकाला अटक (Teacher Arrest) करण्यात आली आहे.
कारवाई म्हणून केवळ शिक्षकाची बदली
राधानगरीच्या शेळेवाडी येथील एका माध्यमिक शाळेतील इंग्रजी शिकवणाऱ्या व्ही. पी. बांगडी या शिक्षकाने विद्यार्थिनीचा गैरफायदा घेत चुकीचे वर्तन केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. व्ही. पी. बांगडी या शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओही दाखवल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारावर पडदा टाकण्यासाठी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची केवळ साताऱ्याती एका शाळेत बदली केली.
शिक्षकाचा पालकांवर दबाव
या शिक्षकाने शाळेतील नववी आणि दहावीच्या मुलींना अश्लील व्हिडीओ दाखविल्याची लेखी तक्रार शाळेतील विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांकडे दिली होती. नोव्हेंबर मध्ये हा प्रकार घडल्यानंतर गाव पातळीवर आणि स्वामी विवेकानंद संस्थेने शिक्षकाची बदली करून हा प्रकार मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संबंधित शिक्षकाने मला बढती मिळण्यामध्ये अडचण होईल असं सांगत शाळेतील विद्यार्थिनी आणि पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली.
आरोपी शिक्षकाला रात्रीच ठोकल्या बेड्या
माध्यमात ही बातमी आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. यानंतर मुख्याध्यापकांच्या तक्रारीनुसार नराधम शिक्षक व्ही.पी बांगडी त्याच्यावर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्यात बदलीच्या ठिकाणावर गेलेल्या व्ही पी बागडी या नराधम शिक्षकाला रात्रीच बेड्या ठोकल्या.
गावपातळीवर प्रकरण दाबण्याचा प्रकार
दरम्यान हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी संस्था चालक, मुख्याध्यापक आणि गाव पातळीवरील सरंपच, पोलीस पाटील यांनी परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास सुरू केला असून केला असून हे प्रकरण दडपणाचा प्रयत्न करणाऱ्यां विरोधात देखील कारवाई करु असं कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन विद्यार्थीनींना दोन वर्षापासून शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केलीय.