Nagpur Goa Shaktipeeth Expressway : 'समृद्धी'नंतर आता राज्यात 'शक्तिपीठ' महामार्ग सुरु होणार आहे. नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. जवळपास 800 किलोमीटरचा हा प्रस्तावित सुपरफास्ट हायवे आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा 11 तासांत गाठता येणार आहे. मात्र, आता नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गा प्रकल्प रडखण्याची शक्यता आहे.
नागपूर ते गोवा या नव्या 800 किलोमीटर च्या शक्तीपीठ महामार्गासाठी सध्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातून या महामार्गाला आता विरोध वाढू लागला आहे. प्रस्तावित या महामार्गात जमिनी जाणाऱ्या कागल तालुक्यातील शेतकरी आता एकवटले आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी आपला लढा सुरू केला आहे.
या शेतकऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देत महामार्गासाठी सुरू असणारा सर्वे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. या नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असताना नव्या महामार्गाची गरज काय ? असा सवाल या संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
नागपूरवरुन गोवा आता फक्त 11 तासांत गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गानंतर आता राज्यात आणखी एक परिवहन क्रांती होणार आहे. समृद्धीनंतर आता राज्यातल्या सर्व शक्तिपीठांना जोडणारा 760 किलोमीटरचा सुपरफास्ट हायवे बांधण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. नागपूर ते गोवा हे अंतर सध्या 1 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. त्यासाठी 22 तास लागतात. मात्र नव्या शक्तिपीठ महामार्गाने हे अंतर कमी होणार असून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या मालाला पश्चिम महाराष्ट्र तसंच कोकणातली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहनं सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगानं सुरू होतं. आता कशेडी बोगद्यातून लहान वाहनं कोकणात जाऊ शकताहेत.