"मी शिवसैनिक म्हणून..."; कोल्हापुरातील तरुणाने रक्ताने लिहीले उद्धव ठाकरे यांना पत्र

कोल्हापुरातील खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असला तरी मतदारसंघातील शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत

Updated: Jul 19, 2022, 07:56 PM IST
"मी शिवसैनिक म्हणून..."; कोल्हापुरातील तरुणाने रक्ताने लिहीले उद्धव ठाकरे यांना पत्र  title=

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल आहे. मात्र शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे वारंवार म्हटले आहे. कोल्हापुरात अशाच एका तरुणाने उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहीत आपला पाठिंबा दर्शवला आहे.

राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक आमदारांसह खासदारही शिवसेनेतून शिंदे गटात जात आहे. मात्र दुसरीकडे  शिवसैनिक मात्र मूळ शिवसेनेत राहणे पसंद करत आहेत. कोल्हापुरातील अशाच एका शिवसैनिकाने उध्दव ठाकरे यांना आपल्या रक्ताने प्रतिज्ञा पत्र लिहीत पाठिंबा दिला आहे.

उध्दव ठाकरे यांना मी शिवसैनिक म्हणून बिनशर्त पाठिंबा देत आहे, असा मजकूर या पत्रात रक्ताने लिहीण्यात आला आहे. सूरज विलास पाटील असे या शिवसैनिकाचे नाव असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेचा रहिवासी आहे.

दरम्यान, कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे. नाईलाजाने प्रवाह बरोबर जावे लागत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी प्रवाहाबरोबर जाण्याचे फायदे आहेत, अशी भूमिका खासदार धैर्यशील माने यांनी मांडली आहे. मंगळवारी शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली यावेळी खासदार धैर्यशील मानेही उपस्थित होते. मात्र त्यांच्याच मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे म्हटले आहे.