Central Railway Update: नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांची लगबग सुरू झाली आहे. नाताळ आणि न्यू इअरसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरायला जाण्याचा प्लान आखतात. पर्यटकांचे गोवा आणि कोकण हे आवडते पर्यटन स्थळ आहे. गोव्यात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येते. त्यानुसार कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गावरुन विशेष गाड्या सोजल्या जात आहेत. अहमदाबाद ते थिविम आणि थिविम ते अहमदाबाद दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष द्वि-साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
गोवा आणि दक्षिण भारतात नाताळच्या सणांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी जातात. त्यामुळं गाड्यांचे बुकिंगदेखील फुल्ल असते. नाताळला 15 दिवस शिल्लक असताना कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने या दोन विशेष द्वि साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद-थिविम ही विशेष द्वि-साप्ताहिक गाडी 8 डिसेंबर ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी प्रत्येक रविवार आणि बुधवारी दुपारी 2.10 मिनिटांनी अहमदाबाद स्थानकातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी 11 वाजता थिविम स्थानकावर पोहोचेल.
थिविम-अहमदाबाद ही विशेष गाडी 9 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी चालवली जाणार आहे. ही गाडी सकाळी 11.40 वाजता थिविम स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.45 वाजता ती अहमदाबाद स्थानकावर पोहोचेल.
या विशेष गाडीला आणंद, वडोदरा, भरुच, उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्टेशनवर थांबणार असल्याचे कोकण रेल्वेने सांगितलं आहे.