Kopardi Rape And Murder Case: कोपर्डी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे सात वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभर मोठा आक्रोश करण्यात आला. राज्यभरात मोर्चे निघाले होते. त्यानंतर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येरवडा कारागृहातील बराकीत गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केली आहे. या आरोपीला न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
आज पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हे निदर्शनास आहे. यानंतर येरवडा पोलिसांनी या मृत्यूची नोंद केली आहे. सकाळी 6 वाजत बराखी खुल्या केल्या जातात आणि नंतर 10 वाजता बंद करण्यात येतात. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कारागृह अधिक्षकांच्या हे निदर्शनास आणून दिले.
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे 13 जुलै 2016च्या संध्याकाळी धक्कादाय घटना घडली. येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद राज्यभर पसरले होते. तिन्ही आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली. या तिघांना फाशी दिली तरच आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशी मागणी पीडितीच्या घरच्यांनी केली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणारे तिन्ही आरोपीकंत्राटी कामगार म्हणून काम करायचे. त्यापैकी दोघेजण हे कोपर्डीचेच रहिवाशी होते. या प्रकरणात न्यायालयात 31 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती.
अहमदनगर विशेष न्यायालयानं तिघांना IPCच्या 376 (2) (i) (m); 302, 354 - A (1) (i) नुसार शिक्षा सुनावली. तसेच तिघांनाही 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. आता यातील पप्पू शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कोपर्डी प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेनं येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलीय आहे." त्याला त्याच्यातलं पाप स्वस्थ बसू देत नव्हतं, हा सरकारने नाही देवाने न्याय केला, आमच्या ताईला काहीसा न्याय मिळाला"अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिलीय.