Koregaon Bhima: विजयस्तंभ अभिवादनासाठी आज जनसागर लोटला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून विजयस्तंभ सर्वांसाठी खुला करण्यात आलाय.(Battle of Koregaon Bhima anniversary) विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. कोरेगाव-भीमा इथे होणाऱ्या शौर्य दिनासाठी पोलिसांकडून मॉकडिल करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 5 हजार काँस्टेबल आणि पाचशेहून अधिक वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. या सोहळ्यावर 6 ड्रोन आणि 185 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
पुणे जिल्ह्याच्या पेरणे (ता. हवेली) येथील कोरेगाव भीमा येथे आज 205 वा शौर्यदिन साजरा होत आहे. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सामूहिक बुध्द वंदना पठन करून शौर्यदिनाला सुरुवात झाली. मध्यरात्री पासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केलीये. भारतीय बौद्ध महासभा सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर, सचिन खरात यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिकांकडून सलामी आणि मानवंदना देण्यात आली. सकाळी 8 वाजल्यापासून सर्व अनुयायांसाठी अभिवादन स्थळ खुले करण्यात आले आहे.
दरम्यान, शौर्यदिनानिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मिळेल त्या गाडीने अनुयायांनी कोरेगाव येथे दाखल होत आहे. अनेकांनी घरुन आणलेला डबा जागा मिळेल त्याठिकाणी खात आहेत. आणलेली शिदोरी खात अनेक अनुयायी दिसत आहे. औरंगाबाद वरुन अनेक लोक दाखल झाले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे. कोरेगाव भीमा या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने वादळ वारा हा भीम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला. भीम शाहीर मेघानंद जाधव यांनी भीम गीत सादर केली.
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य शासनाने समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणाची तयारी केली आहे. गृह विभागाने विविध सूचना निर्गमित केल्या नुसार कार्यक्रम सुरु आहे. डॉ. नारनवरे यांनी येणार्या सर्व अनुयायांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा ( Koregaon Bhima) परिसरात झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तेव्हापासून दरवर्षी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कडक पावले उचलत आहेत.