मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय. प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना उच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलंय. आनंद तेलतुंबडे हे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर गुन्हा नोंदविला. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यावर, 'आपल्याला नाहक या प्रकरणात गुंतवण्यात आलंय, घटनेवेळी आपण गोव्यात होतो तसंच पोलिसांकडे आपल्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत', असा दावा तेलतुंबडे यांनी केला होता. त्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयात एक पत्र सादर केलं तसंच पोलिसांकडे तेलतुंबडे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यावर हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून फार मोठे षड्यंत्र रचण्यात आलं होतं. गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी वेळ देणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं तेलतुंबडे यांची याचिका फेटाळताना म्हटलंय.
गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा प्रकरणी १० आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केलं. यामध्ये सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या इतर कामांबद्दलही तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांचे बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टीशी काय संबंध आहेत, याचा तपास करण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयानं म्हटलंय.
१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमाच्या लढाईत ८०० दलितांनी इंग्रजांकडून लढत, बाजीराव पेशव्यांच्या २७ हजार सैनिकांना हरवलं होतं. या घटनेला १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्ष पूर्ण झाले. याच निमित्तानं कोरेगाव भीमाजवळ उभारलेल्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दलित बांधव जमले होते. या जमावावर हल्ला करण्यात आला, यानंतर दंगल उसळली असं अहवालातून समोर आलंय.