मुंबई : आज यंदाच्या वर्षातली शेवटची अंगारकी आहे. राज्यभरातल्या गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून येतेय. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात.
अंगारकीमुळे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. रात्री १२ वाजल्यापासूनच गणेश भक्तांची बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली आहे. अंगारकीनिमित्त दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यासाठी सहा हजार किलो फुले वापरण्यात आली आहेत. झेंडू ,शेवंती आणि गुलाब या फुलांचा समावेश सजावटीसाठी करण्यात आला आहे. पहाटे प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांनी श्रींच्या चरणी गुणकाला राग सादर करून स्वराभिषेक केला. त्यानंतर गणेश याग आणि गणरायाची आरती हे कार्यक्रम होणार आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदीरात सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. वर्षातील शेवटची अंगारकी आहे. यानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीये. मुंबईसह उपनगरातून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक आले आहेत. दादरमधील प्रभादेवी परिसर भाविकांनी फुलून गेलाय. मोठ्या गर्दीमुळे काही भाविक मुखदर्शन घेऊन किंवा कळस दर्शन घेऊन समाधान मानत आहेत.