'लाडकी बहीण योजना हा मतांसाठीचा जुगाड'; BJP आमदाराचा Video; म्हणाला, 'बाकी खोटं बोलतात मी..'

Ladki Bahin Yojana BJP MLA Video: भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा जाहीर कार्यक्रमामधील भाषणातील व्हिडीओची क्लिप व्हायरल झाली असून विरोधी पक्ष नेत्यांनी ती शेअर केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 25, 2024, 10:37 AM IST
'लाडकी बहीण योजना हा मतांसाठीचा जुगाड'; BJP आमदाराचा Video; म्हणाला, 'बाकी खोटं बोलतात मी..' title=
जाहीर कार्यक्रमात भाजपा आमदाराचं विधान

Ladki Bahin Yojana BJP MLA Video: लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. मध्य प्रदेशमधील अनुभव गाठीशी ठेऊन प्रत्येक महिलेला 1500 रुपये देण्याचा निर्णय या योजनेच्या माध्यमातून घेण्यात आला. या योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयेंची तरतूद राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या योजनेवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी विरोधकांकडून झाडल्या जात असतानाच आता या योजनेवरुन पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारानेच जाहीर सभेमध्ये, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा निवडणुकीसाठीचा जुगाड आहे,' असं विधान केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आता या व्हिडीओवरुन विरोधीपक्षांनी निशाणा साधला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर यांचा एका जाहीर कार्यक्रमातील व्हिडीओ विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. "आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली? इमानदारीने सांगा कशासाठी केलं? अंत:करणाने सांगा बरं हे का केलं? जेव्हा तुमच्या घरासमोर निवडणुकीची मतदानाची पेटी येईल. तेव्हा माझ्या या लाडक्या बहीणी कमळाला मत देतील, यासाठी तर हा जुगाड केला आपण," असं आमदार सावरकर भाषणात म्हणतात. तसेच पुढे बोलताना, "इतर लोक खोटं बोलत असतील मी खरं बोलतोय. माझं म्हणणं खरं आहे का नाही सांगा?" असं म्हणत आमदार सावरकर समोरच्या जनतेला प्रश्न करतात तर समोरुन, "हो" असं एका सुरात उत्तर येतं. पुढे बोलताना या आमदाराने, "नाहीतर बोलायचं एक आणि करायचं एक असेही प्रकार असतात," असं विधानही केलं.

वडेट्टीवार काय म्हणाले?

"अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे," असं वडेट्टीवार कॅप्शनमध्ये म्हणाले आहेत. "भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे," असंही वडेट्टीवार म्हणालेत. तुम्हीच पाहा त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ...

शिंदे-फडणवीस-पवारांच्या डोक्यातलं ओठावर आलं

या व्हिडीओसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी, "खायचे दात आणि दाखवायचे दात आता उघड झालेत. यांच्यामागे लाडकी बहीण नाही, लाडकी मतं आहेत हे सिद्ध झालं आहे. मतदानासाठी केलेले हे सगळं काम होतं, हे त्यांच्या आमदाराच्या मुखातून सिद्ध झालेलं आहे. जे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या डोक्यात होतं ते यांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे," असं म्हणत निशाणा साधला.