लातूर : लातुरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुक्या वन्य जीवांनाही बसल्याचं दिसत आहे. निलंगा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे तेरणा नदीसह अनेक ओढे-नाले हे दुथडी भरून वाहिले. त्यात निलंगा तालुक्यातीलच जेवरी गावाजवळील एका कॅनॉलमध्ये तीन हरणं पडली.
कॅनॉलमधील पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे हरणांना बाहेर येता येत नव्हतं. हे पाहून ग्रामस्थांनी कॅनॉलमध्ये उतरुन हरणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले.
या तीन हरणांपैकी दोन हरणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं. मात्र, तिसरं हरीण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं.