जिल्हा परिषदेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न

 उद्या ६ जानेवारी लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. 

Updated: Jan 5, 2020, 05:16 PM IST
जिल्हा परिषदेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्हा परिषदेत सध्या भाजपची सत्ता आहे. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत लातूर जिल्हा परिषदेतील एकूण ५८ जागांपैकी ३६ जागां पटकावीत भाजपने ३५ वर्षात पहिल्यांदाच लातूर जिल्हा परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळविले होते. ज्यात काँग्रेसचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, शिवसेना आणि अपक्षला प्रत्येकी १ जागा मिळाली होती. आता उद्या ६ जानेवारी लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. 

ओबीसी पुरुष गटाला जिल्हा परिषद अध्यक्षाचे आरक्षण सुटलं असून या निवडीत भाजपने बंडखोरी टाळण्यासाठी पाउले उचलली आहेत.  भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांना शहराजवळील कार्निवल रिसॉर्ट मध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच याबाबत दक्षता कुठलाही दगा फटका टाळण्यासाठी भाजप नेते रावसाहेब दानवे हे कार्निवल रिसॉर्टमध्ये येऊन भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन करून आढावा घेणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच लातूर महापालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत असताना भाजपच्या दोन नगरसेवकांनी बंड केल्यामुळे लातूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली. त्यामुळे भाजप बचावात्मक भूमिकेत आहे. सध्या भाजप आणि काँग्रेसचे पक्षीय बलाबल हे एका जागेने कमी झालेलं आहे. 

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे हे लातूर लोकसभेत निवडून येऊन खासदार झाले आहेत. तर काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य धीरज विलासराव देशमुख हे लातूर ग्रामीण म्हणून विधानसभेत निवडून येऊन आमदार झाले आहेत. त्यामुळे एकूण ५६ जागांपैकी भाजपच्या ३५, काँग्रेसच्या १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ०५, शिवसेना आणि अपक्षाकडे प्रत्येकी ०१-०१ जागा आहेत.  लातूर महापालिकेत भाजप नगरसेवकांनी केलेल्या बंडाची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच ही पाऊलं उचलल्याचे भाजपचे जिल्हा परिषदेतील विद्यामान सभापती संजय दोरवे यांनी स्पष्ट केलं आहे. 

याशिवाय रावसाहेब दानवे हे लातूर जिल्हा भाजप अध्यक्षपदाची आणि लातूर शहर जिल्हाध्यक्षाची निवडही करणार आहेत.