अल्पवयीन मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी नाझीया शेख आणि तिच्या अन्य दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

Updated: Dec 11, 2019, 05:57 PM IST
अल्पवयीन मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, लातूर : अल्पवयीन मुलींची अनैतिक कामासाठी विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अल्पवयीन मुलीची विक्री करणाऱ्या नाझीया मेहबुब शेख, लियाकत लायक शेख, बळीराम विठठल विरादार या तिघा एजंटाना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले आरोपी आणि पीडित मुलगी ही लातूर जिल्हयातील आहे.तर चौथा एजंट सुभाष नामक एजंट अंधाराचा फायदा घेऊन पळाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुलींच्या विक्रीचा व्यवहार चक्क मोबाईल बँकिंग नेट बँकिंगद्वारे करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगतचा तालुका आहे. मिरज मध्ये मोठे रेल्वे जंक्शन असून मिरज शहर हे दक्षिण भारताला जोडणारे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्हा विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी ओळखला जातो. मात्र मागील काही वर्षापासून दुर्देवाने गुन्हेगारी जगताच्या क्षेत्रात सुद्धा मिरज तालुका आणि पर्यायाने सांगली जिल्हा चर्चेत आहे. हे रॅकेट सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उघडकीस आणले.

लातूर मधील राहणारी संशयित आरोपी नाझीया शेखने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तिला अनैतिक कृत्यासाठी विकण्याच्या उददेशाने सांगलीत आणले. तत्पूर्वी फिर्यादी विकास कांबळे सोबत या मुलीचा 52 हजार रुपयास विक्रीचा सौदा केला. धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादी कडून मोबाईल बँकिंगद्वारे दोन हजार रुपये अगाऊ घेतले. गुगलचे अकाउंट वरुन अँडव्हान्स म्हणुन 2 हजार रुपये स्वीकारुन उर्वरीत रक्कम 50 हजार रुपये हे सांगली येथे आल्यानंतर द्यावयाचे ठरले. 

आरोपी नाझीया शेख ही महिला, त्या अल्पवयीन मुलीस घेऊन सांगली येथे आली. अफरीन पठाण हिने विकास कांबळेच्या ताब्यात अल्पवयीन मुलीला देवुन त्याबदल्यात 50 हजार रुपये घेतले. त्याच वेळी पोलिसांनी नाझीया शेख आणि तिच्या अन्य दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. तर एक संशयित तिथून पळून गेला पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सांगली जिल्ह्यात यापूर्वीही ही अल्पवयीन मुलींची विक्री आणि त्यांना अनैतिक व्यवसायात आणण्याबाबत कारवाया झाल्या आहेत. आरोपींना अटक होते आणि त्यांच्या कारवाई होते, मात्र अल्पवयीन मुली किंवा वेश्या व्यवसायासाठी मुलींची विक्री करणाऱ्या रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करावे अशी मागणी होत आहे. त्याच बरोबर अनैतिक व्यापार प्रतिबंध विभागामार्फत कारवाईच नियोजन करून या रॅकेटवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

गरीब आणि असहाय मुलींची फसवणूक करून त्यांना अनैतिक कामात ढकललं जात असून, अश्या नराधमांना कठोर शासन व्हावे अशी सर्वस्थरातून मागणी होत आहे.