Maharashtra Weather News : उत्तर भारतात थंडीचा कडाका दिवसागणिक वाढतच असताना आता मध्य भारतासह महाराष्ट्रापर्यंत या थंडीचा प्रभाव पाहायला मिळत आहे. जन्मू काश्मीरमध्ये हवामान विभागानं बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला असतानाच, देशाच्या उत्तरेकडील मैदानी राज्यांमध्येही किमान तापमानाच लक्षणीय घट नोंदवली जात आहे.
काश्मीर, हिमाचलच्या खोऱ्यात सध्या रक्त गोठवणारी थंडी पडली आहे तर या राज्यांच्या मैदानी क्षेत्रासह पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. इथं महाराष्ट्रात उत्तरेकडील जिल्ह्यांसह विदर्भ भागातही किमान तापमान 10 अंशांवर पोहोचलं असून, हा आकडा आणखी कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
दरम्यान, सध्या राजस्थानच्या नैऋत्येकडे चक्राकार वारे सक्रिय असून, पंजाबच्या उत्तर क्षेत्रापासून अरबी समुद्रातील मध्य पश्चिम भागाकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं काही अंशी उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा शिडकावाही पाहायला मिळू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात सध्या प्रदूषणाचं प्रमाण कमी झाल्यानं थेट सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यानं मुंबई शहर, उपनगर आणि कोकणामध्ये सूर्य डोक्यावर आला असता उष्मा अधिक प्रमाणात जाणवणार आहे.
दिल्लीपासून हिमाचलपर्यंत थंडीचा कडाका वाढत असून, या भागांमध्ये धुक्याचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे. ज्याचा थेट परिणाम रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर होताना दिसत आहे. धुक्यामुळं दृश्यमानता कमी झाल्यानं लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर हवाई वाहतुकीमध्येही हवामानामुळं अडथळे येत असून, अवघ्या 50 मीटर इतक्या दृश्यमानतेमुळं अनेक उड्डाणांना विलंब होत असून, काही उड्डाणं रद्दही करण्यात आली आहेत.