वाहतूक पोलिसाची दादागिरी कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

 वाहतूक पोलीस पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेत. एका तरुणाने वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Updated: Nov 25, 2017, 10:34 PM IST
वाहतूक पोलिसाची दादागिरी कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल title=

लातूर : शहरातील वाहतूक पोलीस पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेत. वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल किरण माशाळे शहरातील अशोक हॉटेल चौक इथे ड्युटी बजावत होते. त्यावेळी शेख अब्दुल युनूस या तरुण वाहनधारकाने वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले.

वाहतूक नियम मोडला आणि...

नियम मोडणाऱ्याला वाहतूक पोलीस माशाळे यांनी त्या दुचाकीस्वाराला दंड भरण्यास सांगितला. मात्र दंड भरण्यावरून या दोघात बाचाबाची झाली. ही बाचाबाची इतकी टोकाला गेली की त्यांनी त्या वाहधारकासोबत भरचौकात झटापट सुरु केली. 

पोलीस कॉन्स्टेबलचे पाय धरले तरीही...

त्यातच वाहनधारक शेख अब्दुल याला वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने पाय धरण्यास भाग पडले. त्यानंतर या तरुणाला गांधी चौक पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी एका ऑटोमधून घेऊन जाण्यासाठीही पोलीस कॉन्स्टेबल माशाळे यांनी चांगलीच जबरदस्ती करीत झटापट केली. 

त्यांची पोलीस मुख्यालयात बदली

हा सर्व प्रकार  अशोक हॉटेल चौकात गर्दी केलेल्या अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर विविध सोशल मीडियातून हा प्रकार व्हायरल झाला. आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओची लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल किरण माशाळे यांची लातूरच्या पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.