लातूर : लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील तोंडार गावात लग्न समारंभातील जेवणातून जवळपास ७० ते ८० जणांना विषबाधा झाली आहे. लग्न समारंभातील जेवणात मठ्ठा प्यायल्याने विषबाधा झाल्याचे बोलले जात आहे. या लग्नानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. लग्न सोहळा पार पडताच गावचा एक ग्रामस्थ थेट प्राथमिक उपचार केंद्रात गेला. त्याला मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला होता. यानंतर हळूहळू अनेकजण प्राथमिक उपचार केंद्रात जाऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
लग्न मंडपा जवळच्या प्राथमिक केंद्रात जाणाऱ्यांची संख्या संध्याकाळ पर्यंत वाढू लागली. दिवसभरात तोंडार येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जवळपास ६० जणांनी तर खाजगी रुग्णालयात २० असे एकूण ८० जणांनी प्राथमिक उपचार घेतले. लग्न समारंभातील जेवणातूनच ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्न समारंभ स्थळी गेले असता त्याठिकाणी सॅम्पल घेण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते. तर पिण्यासाठी पाण्याच्या जारचा वापर केल्याने या घटनेमागचे नेमके कारण समोर आलेले नाही.
दरम्यान कुठल्याही रुग्णाची प्रकृती ही धोकादायक नसून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून दिल्याचे संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.