'मुख्यमंत्री, गृहमंत्री तुम्ही शिव्या खात आहात,' लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान, 'जरांगे नावाच्या भूताला...'

Laxman Hake on Manoj Jarange: मनोज जरांगे (Manoj Jarange) नावाच्या भुताला बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून द्या असं वादग्रस्त विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं आहे. मराठा तरुणांच्या आत्महत्येला मनोज जरांगेच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 14, 2024, 04:46 PM IST
'मुख्यमंत्री, गृहमंत्री तुम्ही शिव्या खात आहात,' लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान, 'जरांगे नावाच्या भूताला...' title=

Laxman Hake on Manoj Jarange: मनोज जरांगे (Manoj Jarange) नावाच्या भुताला बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून द्या असं वादग्रस्त विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं आहे. मराठा तरुणांच्या आत्महत्येला मनोज जरांगेच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्री, गृहमंत्री तुम्ही शिव्या खात असून, हा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपमान आहे असंही ते म्हणाले आहेत. 

"जी गोष्ट कधीच मिळणार नाही, जी गोष्ट संविधानाला, कायद्याला अपेक्षित नाही ती गोष्ट तुम्हाला मिळवून देतो ही भाषा आहे. याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या भूताला वेळीच आवर घातला पाहिजे. हे भूत बाटलीत बंद करावं आणि कुठेतरी अरबी समुद्रात फेकून द्याव. या महाराष्ट्राने कधीही ओबीसी-मराठा वाद पाहिलेला नाही," असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले की, "त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. शिव्या घालतात, अर्वाच्च भाषेत बोलतात. अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगता आणि सार्वजिनक ठिकाणी शिव्या घालता. कोणत्या कलमांचं भंग होत नाही आहे का? मुख्यमंत्री, गृहमंत्री तुम्ही शिव्या खात आहात. हा तुमचा एकट्याचा नाही तर 12 कोटी जनतेचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत असतील तर तो आमचा अपमान नाही का?".

विधान परिषदेतील 'त्या' मराठा आमदारांना पाडणार - जरांगेंचा इशारा

विधान परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवाराला मत देणाऱ्या मराठा नेत्यांना आम्ही पाडणार असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत दिला आहे. "मराठ्यांच्या आमदारांचं मत घेऊन, मराठ्याच्या दारात जाऊन डीजे वाजवून शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही. त्यामुळे ज्या मराठा आमदारांनी मतदान केलं आहे, त्यांनी त्या ओबीसी नेत्यांना नीट सांगायचं अशी तंबीच मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसंच मराठ्याचं मतदान घेऊन जे विधान परिषदेवर आमदार झाले आहेत त्यांनी त्रास दिला, तर ज्या मराठ्याच्या आमदाराने त्याला मतदान केलं त्याला पहिलं पाडणार", असं ते म्हणाले. 
 
"जर मराठा आमदाराच्या मतावर निवडून आला, आणि मराठ्यांच्या गोरगरिबाला ओबीसी नेता त्रास देणार असला तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पाडून टाकायचा. तू मतदान केलं म्हणून ते आमच्या मागे लागले. विधान परिषदेत मराठ्यांच्या मतावर निवडून आलेल्या ओबीसी नेत्याला हा संदेश आहे. तुमचं मराठ्य़ाशिवाय जमत नाही, कशाला विरोध करता. कशाला आमच्या नादी लागता," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.