Laxman Hake On Sambhaji Raje: पुण्यातील कोंडवा येथे सोमवारी रात्री ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा झाला. लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमधील वाद अगदी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. या वादादरम्यान हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला. मात्र हाकेंनी मद्यप्राशन केलेलं नाही असं प्राथमिक आरोग्य अहवालामधून समोर आलं आहे. असं असतानाच सोमवारी रात्री नेमकं काय घडलं याचा घटनाक्रम हाकेंनीच नागपूरमध्ये 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. विशेष म्हणजे हाकेंनी हा सारा प्रकार संभाजी राजे भोसलेंनी घडवून आणल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
लक्ष्मण हाकेंनी सोमवारी पुण्यात घडलेला घटनाक्रम सांगताना दोन तरुण आपल्याला भेटण्यासाठी आले होते. त्यापूर्वी या दोघांपैकी एकाने आपल्याला आधी कॉल केल्याचंही हाके म्हणाले. "पाच वाजता दोन तरुण मला भेटायला आले त्यांचे मोबाईल काढून घेतले तर त्यांनी कोणाकोणशी संपर्क केला याची माहिती गृह खात्याला निश्चित सापडेल. त्यापैकी एकाचं नाव मते होतं आणि दुसऱ्याचं नाव अमित देशमाने होतं," असं हाके म्हणाले. तसेच पुढे बोलताना हाकेंनी, "दोन दिवसांपूर्वी त्याने मला व्हॉट्सअप कॉलही केला होता. त्या दोघांचे मोबाईल काढून घेतले. कालच्या पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजल्यापर्यंतचे कॉल रेकॉर्ड काढले तर हा पूर्वनियोजित कट होता हे गृहखात्याला समजू शकेल," असा दावा केला.
कोणाचा पूर्वनियोजित कट होता? असा प्रश्न हाकेंनी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, "रात्री ज्या पद्धतीने रात्री घटनाक्रम घडला आहे मी आरोप केला आहे छत्रपती संभाजी भोसलेंवर. मी त्यांना छत्रपती म्हणत नाही. मिस्टर संभाजी भोसलेंच्या सांगण्यावरुन या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यांचा तपास व्हावा असा माझा आरोप आहे," असं हाके म्हणाले.
सरकार आंदोलकांमध्ये दुजाभाव करत आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना हाकेंनी, "सरकार निश्चित दुजाभाव करत आहे. तुझ्या जितेंद्र आव्हाड करु, तुझा भुजबळ करु. तुला फिरुच देणार नाही असं म्हटलं जात आहे. स्वत: जरांगेचं स्टेटमेंट आहे की एवढं आंदोलन संपू दे तुला जन्माला का आला अशी पश्चातापाची वेळ तुझ्यावर येईल असं ते म्हणालेत. जरांगेवर हा आरोप आहे," असं उत्तर दिलं.
जरांगेंच्या मागे कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आलं असता हाकेंनी थेट नाव घेतली. "जरांगेंच्या मागे आजी माजी आमदार, खासदार आहेत. मी अनेकदा सांगितलं आहे त्यांच्या मागे शरद पवार आहेत. रोहित पवार आहेत. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे आहेत. ओबीसींच्या मागेच कोणी उभे नाही असं आमचं म्हणणं आहे," असं हाके म्हणाले.