ठाणे - ठाण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या कोरम मॉल आणि त्याच्या जवळच असलेल्या हॉटेल सत्कारमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात बुधवारी सकाळी वन विभागाला यश आले. अत्यंत गजबजलेल्या भागात बिबट्या आल्यामुळे सकाळपासून ठाण्यामध्ये या विषयाचीच चर्चा होती. ठाण्यातील इतक्या आतपर्यंतच्या भागात बिबट्या कसा आला, याचा शोध अद्याप लागलेला नाही. अखेर भूल देऊन बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बुधवारी पहाटे बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली. मॉलमधील वाहनतळातून बिबट्या बाहेर पडत असल्याचे दिसले. साधारपणपणे त्याचे वय ८ वर्षे आहे. मॉलमधून बाहेर पडल्यावर बिबट्या गेला कुठे याचा शोध सकाळपासूनच घेण्यात येत होतो. कोरम मॉलपासून जवळच असलेल्या सत्कार हॉटेलच्या वाहनतळामध्ये बिबट्या शिरल्याचे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून दिसले. यानंतर वन विभाग, अग्निशामक दल आणि पोलीस सत्कार हॉटेलमध्ये पोहोचले. बिबट्या तळघरातील वाहनतळाच्या जागेत होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साह्याने त्याच्यावर नजर ठेवली जात होती. वन विभाग, राजीव गांधी नॅशनल पार्कमधील तज्ज्ञ अधिकारी यांनी वाहनतळाच्या परिसरात जाऊन बिबट्याला डार्टच्या साह्याने बेशुद्ध केले आणि मग त्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले.
ठाण्यातील कोरम मॉलचा परिसर अत्यंत गजबजलेला आहे. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी वन विभागाने शीघ्र गतीने या ठिकाणी कारवाई केली. बिबट्या जर सत्कार हॉटेलच्या तळघरातील वाहनतळाऐवजी अन्य कुठे गेला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, बिबट्या आल्याचे वृत्त ठाण्यात वाऱ्याच्या गतीने पसरले. त्याला बघण्यासाठी सत्कार हॉटेलच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरण्याचे कामही पोलिसांना करावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये बिबट्या आल्याच्या घटना वाढत आहेत. नाशिकमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी सावरकरनगर भागात दोन वेळा बिबट्या आला होता. त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले होते. पुण्यातही मुढव्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये बिबट्या शिरला होता. त्यालाही जेरबंद करण्यात आले होते.