पर्यटकांनो ट्रेकिंगसाठी सिंहगडाला जाताय?; या गावात वावरतोय बिबट्या, VIDEO पाहाच

Leopard In Sinhagarh Area: सिंहगड घेरा परिसरातील चारही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे, आत्तापर्यंत त्याने पाळीव जनावरे आणि कुत्र्यांची शिकार केली आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 18, 2023, 12:29 PM IST
 पर्यटकांनो ट्रेकिंगसाठी सिंहगडाला जाताय?; या गावात वावरतोय बिबट्या, VIDEO पाहाच title=
leopard was spotted in the vicinity of Sinhagad Fort near Pune city

पुणेः पुण्यातील सिंहगड किल्ला (Sinhgad Fort Pune) परिसरात असणाऱ्या मोरदरी गावात बिबट्याचा (Leopard) वावर वाढल्याची बातमी समोर येतेय. गावात असलेल्या काळूबाई मंदिराजवळ बिबट्याचा मुक्त संचार करताना दिसत आहे. बिबट्याचा वावर मोबाईलमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने त्वरित अॅक्शन घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (Leopard Near Sinhagad Fort)

सिंहगड हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी किंवा पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळं पर्यटकांनी गडावर जाताना काळजी घ्यायची गरज आहे. सिंहगडाच्या पायथ्याशीच मोरदरी हे गाव आहे. सोमवारी सायंकाळी सहा साहेसहाच्या सुमारास शिवगंगा परिसरातील घेरा येथे बिबट्या सहज वावरताना दिसून येत आहे. मोरादवाडी येथील साहेबराव यादव यांच्या घरातून हा व्हिडिओ टिपला आहे. गावापासून अवघ्या शंभर-दिडशे अंतरावर बिबट्या दिसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. 

पुण्यातल्या सिंहगड किल्ला परिसरात असणाऱ्या मोरदरी गावातल्या काळूबाई मंदिराजवळ बिबट्याचा मुक्त संचार पहायला मिळाला. ग्रामस्थांनी बिबट्याचा हा वावर आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवरही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सिंहगडाच्या जंगल परिसरात बिबटयाचा वावर असल्याचं निदर्शनास आल्याने परिसरातल्या गावातील लोकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे. 

घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील मोरदवाडी कल्याण दरवाजेच्या दिशेला सिंहगडाच्या कुशीतच आहे. सिंहगडाच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. वर्षभर सातत्याने येथे बिबट्याचे दर्शन होत असतात. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच बिबट्याचे दर्शन झाले आहे. स्थानिकांनी तातडीने वनविभागाला याबाबत माहिती कळवली आहे. भांबुर्डा वनविभागाचे कर्मचारी व घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे. 

पर्यटकांनी काय काळजी घ्यावी

ट्रेकर्स पहाटे साडेतीन वाजताच सिंहगड चढायला सुरुवात करतात. तर काही ग्रुप वेगवेगळ्या मार्गावरून रात्रीचा सिंहगडाचा ट्रेक करतात. याशिवाय गडाच्या मागील बाजूने, नवीन वाटा शोधत गडावर जाणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. मात्र याच परिसरात सध्या बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे गिर्यारोहकांनी एकट्याने भटकंती करू नये, शक्यतो पहाटेच आणि रात्रीचे ट्रेकिंग टाळावे.