तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे. मात्र साताऱ्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील काठच्या गावातील मुलांना शिक्षणासाठी चक्क जीव धोक्यात घालावा लागतोय. साताऱ्यातील अंधारी कास गाव जिल्हातील शंकर भागोजी शेलार या माध्यमिक शाळेतील काही विद्यार्थी चक्क जीवावर उदार होऊन विद्येची ज्योत तेवत ठेवतायेत.
कोयना धरण क्षेत्रातील कांदाटीखोरं इथल्या शिरखंडी गावातील मुलांना धोकादायक प्रवास करावा लागतोय. रोज सकाळी आठ वाजता शाळेत जाण्यासाठी त्यांना मोठी कसरत कारावी लागते वल्हव चालवत शिवसागर जलाशय त्यांना पार करावं लागतं. मात्र यासाठी वल्हवात कोणतेही सुरक्षेचे उपाय सुद्धा नाहीत. हा प्रवास एवढ्यावरच न थांबता पुढे जंगलातील पायवाट तुडवत अंधारी गाव गाठावं लागतं. मात्र जंगलातून जाता नेहमीच इथल्या जंगली जनावरांचा धोका कायम असतो.
अंधारी हे गाव देखील दुर्गम भागातच आहे. त्यामुळे इथल्या शाळांमध्ये येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना जिव धोक्यात घालून रोजचा प्रवास करावा लागतोय. अशा दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करा अशीही मागणी करण्यात येतेय.
कोयना धरण निर्माण झाल्यानंतर इथल्या विस्थापीतांचं भिवंडी, ठाणे या भागात पूनर्वसन करण्यात आलं. मात्र ही जागा पसंत नसल्यामुळे आमच्याच जिल्ह्यात पुनर्वसन करावं अशी मागणी इथले ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.
डिजीटल शाळांपासून विद्यार्थ्यांना टॅब देण्यापर्यंत अनेक अभिनव प्रयोग आज शिक्षणक्षेत्रात होताना दिसत आहे. मात्र महाराष्ट्रात एक शाळा अशी पण आहे जिथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना आजही कंम्प्यूटर आणि टॅबपेक्षा घराजवळ चार भिंतींच्या शाळेची गरज आहे.