Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यातील राजकारणात सत्तास्थापनेनंतरच्या घडामोडींना वेग, राज्यात नेमकं कुठं चाललंय काय?   

Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

Maharashtra Breaking News Live Updates : विदर्भापासून कोकणापर्यंत आणि मुंबईपासून गावखेड्यांपर्यंत... राज्यात नेमकं काय सुरुय? आजचा दिवस कोणत्या घडामोडींमुळं चर्चेत राहणार, कुठं काय घडणार? पाहा महत्त्वाच्या घडामोडींच्या Live Updates एका क्लिकवर... 

9 Dec 2024, 14:12 वाजता

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 13 डिसेंबरला होण्याची शक्यता 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यावर आता येत्या 13 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार असून काल झालेल्या बैठकीत 13 तारखेला शपथविधी घेण्यावर चर्चा तसेच एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच मंत्रिमंडळात किती व कोण कोण असणार यावर देखील चर्चा आणि निर्णय झालाय. 

9 Dec 2024, 14:05 वाजता

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी बहुमताने मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव माजी मंत्री उदय सामंत, संजय कुटे, दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. तसेच फडणवीस सरकारवरील विश्वादर्शक प्रस्ताव विधानसभेत संमत देखील झाला. 

9 Dec 2024, 13:26 वाजता

तहसील कार्यालयाबाहेर निकृष्ट दर्जाच्या तांदळाची खिचडी शिजवून तहसीलदारांना दिली भेट

बीडच्या तहसीलदारांना ग्रामस्थांनी थेट निकृष्ट दर्जाच्या तांदळाने शिजवलेली खिचडी भेट दिली. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या टेबलवर ही खिचडी ठेवून लक्ष वेधण्यात आले. बीड तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरण होत असल्याचा प्रकार समोर आला होता. यावर कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर खिचडी शिजवून आंदोलन केले. या आंदोलनानंतर स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे धान्य चांगल्या दर्जाचे दिले जावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांनी देखील याची दखल घेऊन दक्षता कमिटीमार्फत यात सुधारणा करू असं आश्वासन दिले आहे. परंतु थेट तहसीलदारांना भेट देण्यात आल्या खिचडीची चांगलीच चर्चा होते आहे. 

9 Dec 2024, 13:21 वाजता

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांना कानडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मरीहाळ पोलीस  स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे.

9 Dec 2024, 13:19 वाजता

वक्फ बोर्ड वादावरून राज ठाकरे आक्रमक

वक्फ बोर्ड वादावरून राज ठाकरे आक्रमक. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही. प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रसरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला.

9 Dec 2024, 12:13 वाजता

जय पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आज बारामती विधानसभा मतदारसंघाचा दौरा करीत आहेत त्यांच्या दौऱ्याला मळद गावातून सुरुवात झाली आहे. आज जय पवार, बारामती तालुक्यातील मळद, निरावागज, घाडगेवाडी, मेखळी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी, पिंपळी, ढेकळवाडी, काटेवाडी गावाचा करणार दौरा करणार आहेत. 

 

9 Dec 2024, 12:07 वाजता

कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न 

कर्नाटक पोलिसांनी बेळगाव जाण्यास रोखल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक. कर्नाटकमधून महाराष्ट्राकडे येणाऱ्या गाड्या शिवसैनिकांकडून रोखण्याचा प्रयत्न. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत शिवसैनिकांनी महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या गाड्या पुणे बंगळुरु महामार्गावर रोखण्याचा प्रयत्न. 

9 Dec 2024, 11:31 वाजता

ठाकरे गटाचा एकही आमदार विधानभवनाच्या सभागृहात उपस्थित नाही

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी ठाकरे गटाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नाही. शिवसेना पक्षाचा निकाल देताना राहूल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा आणि वेळकाढूपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. त्यामुळंच राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी ठाकरे गटाचा बहिष्कार. 

9 Dec 2024, 11:18 वाजता

कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलं

कोगनोळी टोलनाक्याच्या आधीच कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीवरील पुलावर कर्नाटक पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना रोखलं. बेळगाव मधल्या एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्यासाठी निघाले असता घडली घडली घटना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी घोषणाबाजी. 

9 Dec 2024, 11:13 वाजता

राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष 

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड. नार्वेकरांची एकमतानं निवड. सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विराजमान.