Maharashtra Breaking News Live Updates : विदर्भापासून कोकणापर्यंत आणि मुंबईपासून गावखेड्यांपर्यंत... राज्यात नेमकं काय सुरुय? आजचा दिवस कोणत्या घडामोडींमुळं चर्चेत राहणार, कुठं काय घडणार? पाहा महत्त्वाच्या घडामोडींच्या Live Updates एका क्लिकवर...
9 Dec 2024, 08:02 वाजता
पिंपरी चिंचवड शहरात नोंद नसलेल्या अडीच लाख नवीन मालमत्ता
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने एका खासगी संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 2 लाख 51 हजार 165 नोंद नसलेल्या मालमत्ता आढळल्या आहेत. यामधील 203894 मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली असून कर आकारणीची कार्यवाही सुरू झाली आहे. विभागाकडून
1 लाख 13 हजार 831 मालमत्ताधारकांना कर आकारणीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजाविली आहे. नोटीस देऊनही कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास संबंधित मालमत्ताधारकांना नियमानुसार मागील सहा वर्षांपासूनची कर आकारणी केली जाणार आहे.
9 Dec 2024, 07:51 वाजता
पुण्यात पारव्यांना खायला टाकत असाल तर सावधान
पुण्यात पारव्यांना खायला टाकत असाल तर सावधान कारण पारव्यांच्या विष्ठेपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत पुणे महानगरपालिकेने कारवाईचा फतवा काढला आहे. तर ज्या भागात पारव्यांची बसण्याची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय अशा ठिकाणावरून पारवे हटवण्याचे उपयोजना महापालिका राबवत आहे.
9 Dec 2024, 07:48 वाजता
पुण्यात मांजा गळ्यात अडकून तरुण जखमी
दुचाकीवरून जात असताना मांजा गळ्याला कापल्याने तरुण जखमी झाला. पुण्यातील मार्केटयार्ड जवळील डायस प्लॉट वसाहत परिसरात ही घटना घडली. तरुणाला गळ्याला आणि हाताला कापले असून, मोठी जखम होऊन टाकेही पडले आहेत. ऋषिकेष वाघमोडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. नायलॉन आणि चायनीज मांजाच्या विक्रीस कायद्याने बंदी असतानाही अनेक ठिकाणी या मांजाची विक्री सुरू आहे. या मांजाच्या विक्रीवर पूर्ण बंदी आणावी तसेच चीनी बनावटीचा मांजा वापरणाऱ्यांवरही कारवाई करा, अशी मागणी नागरिक सातत्याने करत आहेत.
9 Dec 2024, 07:41 वाजता
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. रविवारी रात्री ही बैठक पार पडल्याची माहिती. फडणवीस शिंदेंच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा.
9 Dec 2024, 07:35 वाजता
बेळगावमधील छत्रपती संभाजी चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप
बेळगावमध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे त्या सर्वच ठिकाणाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बेळगाव मधील धर्मवीर संभाजी चौकात देखील अशीच स्थिती आहे.
9 Dec 2024, 07:25 वाजता
राज्यात वाढतोय थंडीचा कडाका
मागील दोन आठवड्यांपासून राज्यावर पावसाचं सावट पाहायला मिळालं. किंबहुना काही भागांना या अवकाळी पावसानं झोडपलं. पण, आता मात्र पावसानं राज्याकडे पाठ फिरवली असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यातही तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्त : Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठा
9 Dec 2024, 07:23 वाजता
जयंत पाटील आज घेणार आमदारकीची शपथ
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि उत्तमराव जानकर आज आमदारकीची शपथ घेणार आहेत. मारकडवाडी गावाच्या दौऱ्यावर असल्याने जयंत पाटील आमदारकीची शपथ घेऊ शकले नाही. त्यामुळे आज जयंत पाटील आणि उत्तमराव जानकर शपथ घेणार आहेत.
9 Dec 2024, 07:22 वाजता
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन
बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन होणार आहे. मात्र अधिवेशनाला कर्नाटक सरकारची मंजुरी नाही नसल्याची माहिती प्रकाश मरगाळे यांनी दिलीय. तर महाराष्ट्रातून येणा-या नेत्यांना बंदी असल्याचं मरगाळेंनी स्पष्ट केलंय.
9 Dec 2024, 07:21 वाजता
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवशी राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार असल्याची चिन्हं. सोमवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असून, दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशन आज वन नेशन वन इलेक्शन बील सादर केलं जाणार आहे. त्यामुळे विरोधकांची काय भूमिका असेल याकडे लक्ष लागलंय.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4