8 Jan 2025, 13:06 वाजता
तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील 4 प्राचीन शिळांना तडे
तुळजापूरमधील तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील चार शिळांना तडे गेल्याची माहिती गाभाऱ्याच्या संवर्धनावेळी धक्कादायक बाब समोर आली आहे. तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. तडे गेलेल्या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. रडारद्वारे ही तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर प्रशासन शिळा बदलण्याचा निर्णय घेणार आहेत. पुरातत्व विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या शिळांची पाहणी केली आहे.
8 Jan 2025, 12:58 वाजता
कल्याणमध्ये शाळेतून घरी जणाऱ्या मायलेकीला डंपरने उडवले; दोघींचा जागीच मृत्यू
कल्याणच्या आग्रा रोड रस्त्यावर श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर चौकामध्ये अपघात झाला आहे. अपघातात एक महिला आणि तिच्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. शाळेतून घरी जात असताना रस्ता क्रॉसिंगच्या वेळी डंपरने मायलेकीला उडवले. महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या डंपरने धडक दिली. डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
8 Jan 2025, 12:54 वाजता
बाळासाहेब थोरात तो अर्ज मागे घेणार
विधानसभेत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पराभवाचं खापर इव्हीएमवर फोडत पडताळणीसाठी अर्ज केला होता. आता मात्र थोरातांनी आपला पडताळणी अर्ज मागे घेतला आहे. 14 मतदान केंद्रावरील पडताळणीसाठी थोरातांनी जमा केलेले 6 लाख 60 हजार रूपये त्यांना पुन्हा परत मिळणार आहेत. या अगोदर राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपूरे आणि कळमकर यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.
8 Jan 2025, 12:23 वाजता
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही आमचीही मागणी, पण...; लक्ष्मण हाकेंचा इशारा
ओबीसी समाजाची आंदोलन ही संतोष देशमुख यांच्या बाबत निघणाऱ्या मोर्चाला प्रतिउत्तर नाही. तर या मोर्चाच्या माध्यमातून जे आम्हाला टार्गेट करण्यात येत आहे, ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे त्यासाठी आंदोलन असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही आमचीही मागणी आहे. मात्र याचं भांडवल करून कुणी राजकारण करू नये. अन्यथा आमचेही मोर्चे राज्यभर दिसतील असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
8 Jan 2025, 11:51 वाजता
बीडमध्ये पोलीस मुख्यालयातच कर्मचाऱ्याने स्वत:ला संपवलं
बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. अनंत मारोती इंगळे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते केज तालुक्यातील कळंम आंबा येथे राहत होते. इंगळे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
8 Jan 2025, 11:50 वाजता
45 वर्षांनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलणार; आता नवा Address...
45 वर्षांनंतर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलणार आहे. '9 ए कोटला रोड' हे आता काँग्रेसचं नवं मुख्यालय असणार आहे. 'इंदिरा गांधी भवन' अस नव्या मुख्यालयाचं नाव असणार आहे. 15 जानेवारीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या हस्ते नव्या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे.
8 Jan 2025, 11:22 वाजता
राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बावनकुळेंचा मास्टर प्लॅन; आज फडणवीसांसमोर करणार प्रेझंटेशन
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. महसूल विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे आज सादरीकरण होणार आहे. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे सादरीकरण केलं जाणार आहे. येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विभागाचा सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
8 Jan 2025, 10:38 वाजता
भाजपाच्या मोठ्या नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट
सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपाचे मुंबईमधील प्रमुख आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली आहे.
8 Jan 2025, 10:00 वाजता
20 महिन्यांपासून रिक्त असणारं 'ते' सरकारी पद भरणार; फडणवीसांचा निर्णय
राज्यात गेल्या 20 महिन्यांपासून मुख्य माहिती आयुक्त आणि अन्य माहिती आयुक्तांची पदे रिक्त ठेवणाऱ्या राज्य सरकारने चौफेर टीका होऊ लागताच मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी माहिती आयुक्तांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी निवृत्त न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांची सदस्य म्हणून या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
8 Jan 2025, 09:35 वाजता
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून...
रत्नागिरीतील मीरकवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनाऱ्यासाठी 2 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे आता अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या समुद्रक्षेत्रात होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. राज्यातील 7 सागरी जिल्ह्यांसाठी 9 ड्रोन मिळणार असून आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मीरकवाडा आणि साखरीनाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मिळणार आहेत. 9 जानेवारीपासून ड्रोनची गस्त सुरू होणार आहे.