Maharashtra Breaking News LIVE Updates: आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...

Maharashtra Breaking News LIVE Updates: आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

8 Jan 2025, 08:44 वाजता

धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे अखेर निलंबन, राज्य सरकारचा निर्णय

शासकीय कामकाजात कसुर केल्याप्रकरणी व आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे राज्य सरकारने अखेर निलंबन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी धाराशिव येथील उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सह राज्य सरकारला दिला होता त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. डव्हळे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी देखील काम बंद आंदोलन केले होते. भूसंपादन कामे प्रलंबित ठेवले, वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे, कारणे दाखवा नोटीसला उत्तर न देणे अश्या अनेक प्रकरणात डव्हळे यांच्या विरोधात तक्रारी होत्या. धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. 

8 Jan 2025, 08:41 वाजता

येवल्यात विठ्ठल नगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी येवला शहरात धुमाकूळ घातला असून चोरटे बंद घरांना लक्ष करत आहेत. विठ्ठल नगर परिसरातील प्रदीप कृष्णदास सोमासे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून घरातील ऐवज व पैशाची चोरी करण्यात आली. अशाचप्रकारे दोन ते तीन ठिकाणी घराचे कडी-कोंडे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी नागरिक जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.

8 Jan 2025, 06:53 वाजता

उल्हासनगरात गॅस पाईपलाईन फुटली

उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरातील डॉल्फिन क्लब रोडवर मंगळवारी महानगर गॅसची पाईपलाईन फुटली होती. सीएनजी पंपासमोर ही घटना घडली. या  घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. उल्हासनगर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचत त्यांनी गॅस पसरू नये म्हणून त्यावर पाण्याचा मारा केला. त्यांनतर महानगर गॅस आपत्कालीन विभागाने तातडीने गॅस पाईपलाईन बंद केली आणि दुरुस्तीचे काम सुरू केलं. अखेर अर्ध्या तासात परिस्थिती नियंत्रणाखाली आली.

8 Jan 2025, 06:49 वाजता

आज नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याने आज बुधवारी दिनांक आठ जानेवारी रोजी नवी मुंबईमधील सर्व प्रभागात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यत पाणी पुरवठा होणार नाही. तसेच गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

8 Jan 2025, 06:47 वाजता

तब्बल पाच महिन्यानंतर 'या' किल्ल्यावरील संचारबंदी पोलिसांनी उठवली

विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलै पासून विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती, तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनाने 31 जानेवारी पर्यत ही संचारबंदी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यत उठवली आहे. त्यामुळे आजपासून विशाळगड पर्यटकासाठी काही वेळेसाठी का असेना खुला झाला आहे.

8 Jan 2025, 06:45 वाजता

मिरजेत बेकायदेशीर गॅस रिफ्लिंग अड्ड्यावर छापा; दोघांना अटक 

सांगलीच्या मिरज शहरामध्ये बेकायदेशीर सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. शहरातल्या मालगाव रस्त्यावरील दिंडी बेस्ट या ठिकाणी भरवस्तीमध्ये वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर मिरज पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली आहे. त्याचबरोबर सहा गॅस सिलेंडरच्या टाक्या, गॅस रिफिलिंग साहित्य आणि एक रिक्षा असा 1 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिरज शहरामध्ये घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचा वापर बेकायदेशीररित्या वाहनांच्या गॅस रिफिलिंगसाठी करण्याचा उद्योग सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.

8 Jan 2025, 06:44 वाजता

नायलॉन मांजा वापरणाऱ्या टवाळखोरांवर ड्रोनद्वारे नजर; पालकांवर दाखल होणार गुन्हे

बंदी असलेला नायलॉन मांजा येवला शहरात चोरीछुपे विकला जात असून पोलीस त्यावर कारवाई करत आहेत. तरी देखील काही टवळखोर नायलॉन मांज्याद्वारे पतंग उडवीत आहेत. या नायलॉन माणसाने माणसासह पक्षांना हानी होत असून पतंग उडवणाऱ्या टवाळखोरांवर येवला शहर पोलीस ड्रोनद्वारे नजर ठेवत असून मुलांच्या पालकांवर आता गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

8 Jan 2025, 06:41 वाजता

बदलापुरातील ग्रामीण रुग्णालयाला राष्ट्रवादीने दिलं कुलूप भेट

बदलापुरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या रुग्णालयातील एका डॉक्टर रुग्णाशी अतिशय उद्धटपणे बोलला त्यामुळे राष्ट्रवादी सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालयातील अधीक्षकांना कुलूप,चावी भेट देत हे रुग्णालय बंद करून दाखवा असा इशारा दिलाय. 

8 Jan 2025, 06:39 वाजता

जतच्या माडग्याळजवळ तिहेरी अपघातात चार जण जखमी

सांगलीच्या जत तालुक्यातल्या माडग्याळ म्हणजे तिहेरी अपघात झाला यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. माडग्याळ गावापासून काही अंतरावरील उमदी रोडवर छोटा हत्ती टेम्पो आणि दोन चार चाकीच्या मध्ये हा विचित्र अपघात झाला आहे. तिन्ही गाड्यांच्या चालकासह चौघेजण जखमी झाले त्यांना उपचारासाठी तुम्ही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. अपघातामध्ये तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

8 Jan 2025, 06:37 वाजता

हिंगोलीतही जरांगेवर गुन्हा दाखल

परळी, नांदेडनंतर आता हिंगोलीत ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथे सर्वधर्मीयांकडून मोर्चा आयोजित करण्यात आला होता, या मोर्चाचे नेतृत्व करीत असतांना मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच नाव घेऊन धनंजय देशमुख यांना यापुढे तुम्ही धमकावलात महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर मुंडे समर्थकांनी दोन दिवसांपूर्वी हिंगोली पोलिस ठाण्यात जाऊन मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. महेश गणपत बांगर यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.