Breaking News LIVE Updates: राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील संभ्रम कायम असून राजकीय घडामोडींना अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबरोबर मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार यासंदर्भात उत्सुकता कायम आहे. राजकीय घडामोडींबरोबरच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.
26 Nov 2024, 08:18 वाजता
मुंबई विमानतळावर 2.71 कोटींचे सोने हस्तगत
दुबईतून मुंबईमार्गे मालेला जाणाऱ्या एका प्रवाशाला आणि विमानतळावरील एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने सोने तस्करीप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडे तीन किलो 900 ग्रॅम सोने होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी 71 लाख रुपये आहे. दुबईतून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो माले येथे जाणार होता. त्यामुळे तो विमानतळाच्या ट्रान्झिट परिसरात होता. या दरम्यान त्याने त्याच्याकडील एक बॉक्स त्या परिसरात काम करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या दोघांनाही थांबविले आणि त्या बॉक्सची तपासणी केली असा त्यात सोन्याचे 12 गोठवलेले बार आढळून आले. ते त्यांच्याकडे कसे आले याचे उत्तर दोघांनाही देता आले नाही.
26 Nov 2024, 08:15 वाजता
कल्याण-डोंबिवलीत आज पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिक उपकरणांची दुरूस्ती आणि वाहिनीवरील गळती थांबवणे व व्हॉल्व्हची दुरूस्त करण्याकरीता मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण पाणी पुरवठा बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरास होणार संपूर्ण पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी, सदर परीसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकलेच्यावतीने करण्यात आले आहे.
26 Nov 2024, 08:05 वाजता
कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाचे कामकाज अंतिम टप्प्यात; शरद पवार, प्रकाश आंबेडकरांचीही झालेली चौकशी
कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष सरकारी वकिलांकडून आज 500 पानांचा अंतिम लेखी युक्तिवाद सादर केला जाणार आहे. आयोगाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी आयोजित कार्यक्रमानंतर दोन गटांत हिंसाचार झाला होता. त्यावर राज्य सरकारने 9 फेब्रुवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची स्थापना केली होती. पुणे पोलीस दलातील अधिकारी, ग्रामीण पोलीस, माजी जिल्हाधिकारी सौरभ राव, ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रकाश आंबेडकर, कोरेगाव भीमा आणि वढू बुद्रुकचे ग्रामस्थ, कार्यकर्त्या हर्षाली पोतदार यांच्यासह 53 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या
26 Nov 2024, 07:21 वाजता
डॉलरच्या तुलनेत रुपयात दहा पैशांनी वाढ
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सोमवारी दहा पैशांनी वधारून 84.31 वर बंद झाला. आंतरबँक परकी चलन बाजारात रुपया 84.38 वर उघडला आणि ग्रीनबॅकच्या तुलनेत दिवसभरात त्याने 84.25 चा उच्चांक गाठला. दिवसअखेर रुपया डॉलरच्या तुलनेत शुक्रवारच्या (21 नोव्हेंबर रोजी) 84.41 वरून दहा पैशांची वधारून 84.31 वर बंद झाला. शुक्रवारी, रुपया त्याच्या सार्वकालिक नीचांकी स्तरावरून सावरला होता आणि डॉलरच्या तुलनेत नऊ पैशांनी वाढून 84.41 वर बंद झाला होता. अमेरिकेत रोख्यांच्या उत्पन्नातील वाढ, भू- राजकीय तणाव काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हे आहेत. इस्राईल- हिजबुल्लाह युद्धविराम करार होण्याची शक्यता, रशिया-युक्रेन युद्धातही आलेली शिथिलता यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
26 Nov 2024, 07:18 वाजता
मुंबईतील हवेचा दर्जा पुन्हा खालावला
दिवाळीनंतर पुन्हा एकदा मुंबईतील हवेचा स्तर खालावला आहे. मागील शनिवारपासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 187 ते 194 दरम्यान पोहोचला आहे. त्यामुळे श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी असमाधानकारक स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावत आहे. वाढत्या प्रदूषणासाठी वाहने, बांधकामे आणि कंपन्याच जबाबदार नाहीत, तर तापमानात घट झाल्यामुळे प्रदूषणाचे कण वातावरणात कायम राहतात. तसेच शहरात धुकेही दिसून येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 'समीर' अॅपनुसार, सोमवारी मुंबईतील हवेची सरासरी गुणवत्ता 190 एक्यूआय नोंदवण्यात आली.
26 Nov 2024, 07:18 वाजता
म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाने 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली असून त्याला इच्छुक अर्जदारांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. 11 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान 2264 घरांसाठी अनामत रक्कमेसाठी केवळ 2514 अर्ज दाखल झाले आहेत. अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली असून आता अर्ज विक्री – स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. त्यानुसार लवकरच मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मुदतवाढ दिल्यास 27 डिसेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
26 Nov 2024, 07:15 वाजता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मागच्या सुनावणीमध्ये शरद पवारांचा फोटो वापरू नका असे स्पष्ट निर्देश कोर्टाने अजित पवार यांच्या पक्षाला दिले होते. ही सुनावणी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी झालेली.
26 Nov 2024, 07:15 वाजता
सोन्याचे दर एक हजाराने तर चांदी 1600 रुपयांनी घसरली
कमकुवत जागतिक कलामुळे सोमवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी घसरून 80 हजार रुपयांच्या खाली घसरला. नवी दिल्लीत शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी शुक्रवारच्या 80 हजार 400 रुपयांच्या तुलनेत एक हजार रुपयांनी घसरून 79 हजार 400 रुपयांवर आला. चांदीचा भावही किलोमागे १६०० रुपयांनी घसरून 91 हजार 700 रुपये झाला. शुक्रवारी चांदीचा भाव 93,300 रुपये होता.
26 Nov 2024, 07:11 वाजता
पुण्यातून आता 'या' दोन देशांमध्ये थेट विमानसेवा
पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये आता वाढ झाली आहे. पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या आता चार झाली आहे. पुणे विमानतळाने हिवाळी वेळापत्रकात या नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन केले होते. इंडिगो एअरलाइन्सने पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. याचबरोबर इंडिगोनेच पुणे ते दुबई थेट विमानसेवा सुरू केली आहे.
26 Nov 2024, 07:11 वाजता
सोमवारी रात्री फडणवीसांचा दिल्लीत धावता दौरा; रात्रीच मुंबईत परतले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. मात्र "राज्याच्या राजकारणा संदर्भात दिल्लीत आज कोणतीही बैठक नाही," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सस्पेन्स पुन्हा एकदा वाढला आहे. "लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलोय आज रात्री माझी कुणाशीही बैठक नाही," असं फडणवीसांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस रात्रीच पुन्हा मुंबईला परतले. आज दिल्लीत महायुतीची बैठक होणार की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.