कल्याण-डोंबिवलीत २ ते १२ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

Updated: Jun 30, 2020, 09:59 PM IST
कल्याण-डोंबिवलीत २ ते १२ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने अखेर २ जुलै ते १२ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. किराणा मालाची दुकाने फक्त होम डिलिव्हरी करीता सुरू राहणार आहे. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत होती. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. दुसरीकडे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्याने कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढला होता. त्यामुळे आज १० दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 

कल्याण-डोंबिवलीच्या आजुबाजुच्या शहरांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ठाण्यात देखील लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. 

राज्यात कोरोना संसर्गबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे केडीएमसीत पुन्हा लॉकडाऊन करा, अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवलीतील आमदारांनी काही दिवसांपूर्वी केली होती.