लॉकडाऊन : पुण्यात भांडखोर नवऱ्यांना करणार क्वारंटाइन

कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आता नवीन समस्या पुढे आली आहे.

Updated: Apr 17, 2020, 03:19 PM IST
लॉकडाऊन : पुण्यात भांडखोर नवऱ्यांना करणार क्वारंटाइन title=
संग्रहित छाया

पुणे : कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 'स्टे होम' चा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र, २१ दिवसानंतर एकत्र राहिल्यानंतर घरात वाद होत असल्याच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. नवरा-बायकोमध्ये हा वाद विकोपाला जावू लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नवरोबांना तंबी दिली आहे. आता भांडखोर नवऱ्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. तसे लेखी आदेश जारी केले आहेत.

लॉकडाऊनमुळे सध्या पुणे जिल्ह्यातील विविध गावांमधील अनेक घरांमध्ये नवरा-बायकोच्या कुरबुरींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. तशा तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून पुण्यात भांडखोर नवऱ्यांना करणार क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कुरबुरी थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामस्तरावर महिला दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यात ग्रामस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या समिती माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे. यावेळी भांडखोर नवरोबांना समज देणार आहे.  मात्र तरीही भांडखोरपणा कायम ठेवणाऱ्या नवरोबांना पोलिसांच्या मदतीने थेट संस्थात्मक क्वारंटाइन करणार आहे. तसे जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले आहेत. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत लेखी आदेशच काढले आहेत.